मराठवाड्यात 11 महिन्यात 781 शेतकरी आत्महत्या!

मराठवाड्यात 11 महिन्यात 781 शेतकरी आत्महत्या!

अमित फुटाणे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : सततची नापिकी, दुष्काळ आणि लहरी निसर्गामुळे शेतकरी खचला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र संपता संपत नाही. आता तर शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. सरकारने कर्जमाफी केल्याची घोषणा केली, विविध योजना जाहीर केल्या, मात्र तरीसुद्धा आत्महत्यांच्या संख्येत घट होत नाही.

आता तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळं ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त आहे. सर्वाधिक 161 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये 144 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 122 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. या आत्महत्या थांबवण्यात वा कमी करण्यात प्रशासन, सरकार सगळेच कमी पडल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसतंय.

कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?

1. बीड 161

2. औरंगाबाद 144

3. उस्मानाबाद 122

4. परभणी 110

5. नांदेड 86

6. जालना 71

7. लातूर 68

8. हिंगोली 49

आत्महत्यांच्या या आकडेवारीवरुन शेतकरी पूर्णत: खचल्याचं दिसतंय. सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजना खऱ्या आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? याची चाचपणी सरकारने करायला हवी. तसंच निसर्गाने साथ सोडली तरी आम्ही सोबत आहोत, हा विश्वास सरकारने शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI