शेतकऱ्यांची बिलं थकवणाऱ्या 'न्यू फलटण शुगर वर्क्स'वर कारवाई कधी?

सातारा: सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने यंदाचे ऊसाचे बिल थकवल्यामुळे सातारा,पुणे,सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीराजा आक्रमक झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या थकलेल्या बिलाचा पहिला बळी साताऱ्यातील सालपे गावात गेला आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. पश्चिम महाराष्ट्र हा ऊसासाठी सदन समजला जातो. या पट्ट्यात अनेक शेतकरी …

शेतकऱ्यांची बिलं थकवणाऱ्या 'न्यू फलटण शुगर वर्क्स'वर कारवाई कधी?

सातारा: सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने यंदाचे ऊसाचे बिल थकवल्यामुळे सातारा,पुणे,सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीराजा आक्रमक झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या थकलेल्या बिलाचा पहिला बळी साताऱ्यातील सालपे गावात गेला आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा ऊसासाठी सदन समजला जातो. या पट्ट्यात अनेक शेतकरी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात. अनेक साखर कारखान्यांच्या माध्यमातून योग्य भाव शेतकऱ्याला मिळावा, यासाठी प्रत्येक कारखानदार प्रयत्न करत असतो. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याचे, ऊसाचे बिल थकल्यामुळे, हा कारखाना यावर्षात बंद अवस्थेत आहे.

1933 सालातील या कारखान्याची स्थापना असून पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य अशी एकेकाळची या कारखान्याची ओळख आहे. 2007 च्या हंगामापासून हा कारखाना शरद पवारांचे निकटवर्तीय प्रल्हाद साळुंखे- पाटील यांनी स्वत:कडे घेतला. सुरुवातीची 8 ते 10 वर्षे ऊसाचा गाळप हंगाम सुरळीत पार पडला. मात्र कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी या कारखान्यातील नूतनीकरणाच्या कारणातून विविध संस्थांचे तसेच बँकाचे कर्ज घेतले. कालांतराने हे थकित कर्ज 250 कोटींवर जाऊन पोहचले. यामुळे कारखान्याशी संबधित सातारा,पुणे,सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2017/18 चे ऊसाचे 51 कोटीचे बिल अडकले.

याबरोबरच कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही 8 कोटींचे वेतन मागील 11  महिन्यापासून मिळालेले नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी आंदोलन केली. मात्र शासनाकडून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. फलटण तालुक्यांतील बहुतांश गावात या कारखान्याचे ऊसाचे बिल थकित आहे. यापैकी लोणंदजवळ असणाऱ्या सालपे गावातील शेतकऱ्यांचे याच कारखान्याने तब्बल दीड कोटीचे बील थकवल्याने, याठिकाणचे शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या सालपे गावातील शेतकरी भगवान मारुती शिंदे यांना बिलाची रक्कम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येच पाऊल उचललं.

भगवान शिंदे यांनी त्यांचे ऊसाचे 75 हजाराचे थकित बिल मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे, त्यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भगवान शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लग्न पत्रिकेच्या कव्हरवरती आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. यामध्ये “साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्यातील ऊसाचे बिल न दिल्याने जिवाला आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझे कुणाशी वैर नसून माझ्या मुलीला आणि वाड्यातील माणसांना या प्रकरणी कोणीही त्रास देऊ नये” अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

दरम्यान एका वृद्ध शेतकऱ्याने साखर कारखान्याच्या बुडवेगिरीमुळे आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या विषयी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

थकित बिलाच्या रकमेबाबत न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत आहे, मात्र आतापर्यंत कारखान्याच्या कारवाईबाबत कोणतंही पाऊल टाकण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचे पहायला मिळालं. मात्र सालपे गावचे शेतकरी भगवान शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का हे पहाणे महत्त्वाचे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *