Lambretta | सत्तरच्या दशकातली लोकप्रिय ‘लॅम्ब्रेटा’ स्कूटर आठवतेय का? लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर!

‘स्कूटर्स इंडिया’ कंपनी सध्या प्रचंड तोट्यात काम करत आहे. शेवटच्या तिमाहीत हा तोटा तब्बल 6 कोटींवर पोहोचला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:50 PM, 20 Jan 2021
Lambretta | सत्तरच्या दशकातली लोकप्रिय ‘लॅम्ब्रेटा’ स्कूटर आठवतेय का? लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर!

मुंबई : सत्तरच्या दशकातली प्रसिद्ध लॅम्ब्रेटा स्कूटर आणि विक्रम टेंपो बनवणारी कंपनी ‘स्कूटर्स इंडिया’ला लवकरच टाळे लावण्याची तयारी सरकार करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ‘स्कूटर्स इंडिया’ बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्र सरकारने आधीही या कंपनीला बंद करण्याबाबत वक्तव्य केले होते. स्कूटर्स इंडियामध्ये सरकारची 93.87 टक्के भागीदारी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या समभागाला 5% अप्पर सर्किट (जेव्हा फक्त शेअर खरेदी केले जातात, विकले जात नाहीत) मिळाले आहे (Lambretta scooter making company scooters india pvt ltd shutting soon).

लॅम्ब्रेटा स्कूटरची रंगतदार कथा..

स्कूटर इंडियाबद्दल अनेकदा एक मनोरंजक किस्सा सांगितला जातो. 1972 मध्ये कंपनी प्रथम लखनौला पोहोचली. पूर्वी या कंपनीचे नाव ‘इनोसेन्टी’ असे होते. ही कंपनी पूर्वी इटलीतील सुंदर शहर मिलान मधील लॅम्ब्रो नदी जवळ लॅम्ब्रेट येथे होती. फर्डिनान्डो इन्नोसेन्टी यांच्या प्रयत्नांमुळे ही कंपनी 1922मध्ये अस्तित्त्वात आली. त्यांच्या नावावरूनच कंपनीला ‘इन्नोसेन्टी’ असे नाव दिले. या कंपनीचे उत्पादन असलेली ‘लॅम्ब्रेटा’ पुढे जगभरात प्रसिद्ध झाली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातही खासगी वाहनांकडे लोकांचा कल वाढू लागला. परंतु, सर्वसाधारण लोकांकडे लहान कार खरेदी करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. हा विचार करूनच ‘लॅम्ब्रेटा स्कूटर’ भारतात आली. मुंबई- आधारित एपीआय (ऑटो प्रॉडक्ट्स इंडिया) यांनी येथे ‘लॅम्ब्रेटा’चे प्रोडक्शन सुरू केले.

मध्यमवर्गात स्कूटर ठरली सुपरहिट

काही दिवसात लॅम्ब्रेटा स्कूटर भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबात सुपरहिट ठरली. परंतु 70च्या दशकात जेव्हा इटलीमधील घरगुती कामगारांनी आर्थिक अडचणींमुळे आंदोलन सुरू केले. यानंतर 1971मध्ये उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ‘स्कूटर इंडिया’ लखनौमध्ये पुनर्वसित करण्याची शिफारस केली (Lambretta scooter making company scooters india pvt ltd shutting soon).

भारतामध्ये आगमन

त्याच्या एका वर्षानंतर, 1972मध्ये भारताने इटलीमधून या कंपनीचा उद्योग व यंत्रसामग्री, कागदपत्रे आणि ट्रेडमार्क खरेदी केले. यातून ‘स्कूटर इंडिया लिमिटेड’ या भारतीय ब्रँडचा उदय झाला.

8 एप्रिल 1973 रोजी, लखनौ शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर कानपूर रोडजवळ, 147.49 एकरांवर ‘स्कूटर इंडिया’ची पायाभरणी झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यावेळी भूमिपूजन केले. या ठिकाणी तीन चाकी ट्रक ‘विक्रम लॅम्ब्रो’ बनवण्याचा हेतू होता, परंतु ‘लॅम्ब्रेटा स्कूटर’ने उत्पादनाची सुरुवात झाली. वर्षाभरानंतरच युनिटने काम सुरू केले. त्यानंतर लवकरच ‘विजय डिलक्स अँड एक्स्पोर्ट’साठी ‘लॅम्ब्रेटा’ या नावाने कमर्शिअल उत्पादन सुरू झाले.

‘स्कूटर इंडिया’ची सद्य परिस्थिती

‘स्कूटर्स इंडिया’ कंपनी सध्या प्रचंड तोट्यात काम करत आहे. शेवटच्या तिमाहीत हा तोटा तब्बल 6 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या पाच तिमाहीपासून ही कंपनी सतत तोट्यात आहे. म्हणूनच केंद्र सरकारने स्कूटर्स इंडिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात आपला प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार या कंपनीची सर्व जमीन विकली जाईल. तसेच सरकारी जमीन उत्तर प्रदेश सरकारला परत केली जाईल. यंत्रे आणि प्लांट देखील विकले जातील.

‘स्कूटर्स इंडिया’ हा ब्रँड स्वतंत्रपणे विकला जाणार आहे. या विक्रीची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. कंपनी विक्री करण्याची जबाबदारी एमएसटीसी अर्थात मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनला देण्यात येईल. ही सरकारी कंपनी विकून जे पैसे मिळतील, त्यातून कंपनीच्या कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन दिले जाईल. तसेच बंद होण्याआधीच तिला शेअर बाजारातून देखील ‘डिलिस्ट’ केले जाईल.

(Lambretta scooter making company scooters india pvt ltd shutting soon)

हेही वाचा :