BLOG : सीएए'मुळे सोशल मीडियावरील मैत्रीत दुरावा,'अनफ्रेन्ड', अनफॉलो'चा 'ट्रेंड' गप्पांचे वादविवादात रुपांतर

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबत परिपूर्ण कायदेशीर माहिती अभावी सोशल मिडियावरील मैत्रीत दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. समर्थक आणि विरोधक असे गट तयार झाले असून मित्रांच्या गप्पांचे रुपांतर आता वादविवादात होत असल्याचे दिसून येत आहे.

Social Media and CAA, BLOG : सीएए’मुळे सोशल मीडियावरील मैत्रीत दुरावा,’अनफ्रेन्ड’, अनफॉलो’चा ‘ट्रेंड’ गप्पांचे वादविवादात रुपांतर

अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबत परिपूर्ण कायदेशीर माहिती अभावी सोशल मिडियावरील मैत्रीत दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. समर्थक आणि विरोधक असे गट तयार झाले असून मित्रांच्या गप्पांचे रुपांतर आता वादविवादात होत असल्याचे दिसून येत आहे. असामाजिक तत्त्वाकडून हेतुपुरस्सर देशात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी तरुणांना लक्ष्य करुन त्यांच्यात दुफळी निर्माण केली जात असून तरुणही एकमेकांना पत्थरबाज किंवा राष्ट्रविरोधी अशी विशेषणे लावत असल्याने वाद निर्माण होत आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात होणाऱ्या निषेधाच्या घटनांमुळे पोलिसांशी झालेल्या चकमकीत सुमारे 20 जण ठार झाले असून अनेक जखमी झालेत. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपवर जोरदार वादविवाद सुरू झाला आहे. याचा देशातील सामाजिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नोंदविला.

जनसामान्यात सीएए आणि एनआरसीबाबत संपूर्ण माहिती नसल्याने सोशल मीडियावर देशासाठी घातक चित्र निर्माण झाले आहे. कधी नव्हे ते विद्यार्थी वर्गाकडून यात मोठा सहभाग घेतला जात आहे. बालपणीच्या मित्रांमधील नातेसंबंधांना सुरुंग लागत असून विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविरुद्ध उभे ठाकले असून अनेक विद्यार्थी व्हॉट्‌सअॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत. काही असामाजिक तत्त्वाकडून भारत तरुणांचा देश असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांत दुफळी निर्माण केली जात आहे. मात्र, भविष्यात याचे खापर राजकीय पक्षांवर फोडले जाण्याची शक्‍यता आहे. तरुणांच्या भावनांना चिथावणी देत देशातील सौहार्दाचे वातावरण दूषित केले जात आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी ओळखण्याची गरज असून याचा निषेध नोंदविण्याची आवश्‍यकता पारसे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी धार्मिक व जातीय द्वेषाची मैत्रीला झळ बसू न देण्याची या काळात गरज असून असामाजित तत्त्वाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे आवश्‍यक आहे. सोशल मिडियावरील सकारात्मक बाजूमुळे नुकताच हैदराबाद येथील दुर्दैवी घटनेत आरोपींना तत्काळ शिक्षा झाली. सोशल मिडियावर या घटनेबाबत ‘सायलेंट प्रोटेस्ट’ करुन तरुणांनीच प्रशासनावर दबाव निर्माण केला. परिणामी आज महिलांठी सुरक्षा मोबाईल अॅप, ‘पिक अॅण्ड ड्रॉप’सारखी व्यवस्था निर्माण झाली. या घटनेवर सामाजिक विष कालावणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात आला. जात, धर्म, राजकारणाच्या पलिकडे जाऊन येथे तरुणांनी राष्ट्रवाद गाजवला. अशाच सोशल मीडिया आंदोलनाची पुन्हा गरज निर्माण झाली आहे.

सीएए व एनआरसीवर संपूर्ण देशात जागृती करणे, असामाजिक तत्वांचे छुपे एजेंडे, मनसुबे उधळून पाडत शैक्षणिक संस्था, विद्यार्थी वर्गात, समाजात धुसफुसणारी ठिणगी सकारात्मकतेने विझवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सीएएत 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आश्रय घेतलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, शीख, ख्रिश्‍चन, जैन, बौद्ध आणि पारशींना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. सोशल मीडियाद्वारे आवाहन करत सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित यावर चर्चा करुन मुद्दे समजून घेण्याच्या आवश्‍यकतेवरही त्यांनी भर दिला.

भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांची मानसिकता लक्षात घेऊन सोशल मिडियाचा विकृत वापर करुन जनतेला वेळोवेळी यंत्रणेच्या विरोधात उभे करुन आंतर युद्ध सदृश्‍य परिस्थिती निर्माण करण्यात येते. यात बहुतांशवेळा देशाबाहेरील तत्वांचा मुख्य हातभार असतो. परंतु दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नसल्याने बहुतांश नागरिक याला देशांतर्गत राजकारणाचे परिणाम समजून व्यक्त होतात. राष्ट्रविरोधी तत्वांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘डिव्हाईड अॅण्ड रुल’ची पुनरावृत्ती उधळून लावत देशात हेतुपुरस्सर तयार झालेली युद्धसदृश्‍य तेढ आपसात सोडविण्याची गरज आहे.

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *