साहित्य संमेलनावर साहित्यिकांचे बहिष्कारास्त्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिला तर ‘साहित्य संमेलन आणि वाद’ हे प्रकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. प्रत्येक साहित्य संमेलन कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडल्याचे दिसते. 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळ येथे होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड केली आहे. […]

साहित्य संमेलनावर साहित्यिकांचे बहिष्कारास्त्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिला तर ‘साहित्य संमेलन आणि वाद’ हे प्रकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. प्रत्येक साहित्य संमेलन कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडल्याचे दिसते. 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळ येथे होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड केली आहे. पण संमेलन अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच साहित्य विश्वात मोठे वादळ उठले आहे. वादाचा हा धुरळा मराठीच नाही तर भारतीय साहित्य विश्वात उडालेला दिसतो. याला कारण म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त जेष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण आयोजकांनी पत्र पाठवून परत घेतले आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका कशाला, मराठी लेखकाच्या हस्ते उद्घाटन करा, नाहीतर संमेलन उधळून लावू, अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजकांना दिली होती. साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी या धमकीला भीक घातली आणि नयतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रित परत घेत असल्याचे कळवले. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे पत्र पाठविले आहे. खरे तर ही ज्ञानोबा-तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समतेच्या महाराष्ट्रातील संतापजनक घटना म्हणावी लागेल.

मोतीराम पौळ, मुक्त पत्रकार, पुणे

या घटनेचे तीव्र पडसाद मराठी साहित्य विश्वात उमटत आहेत. अनेक साहित्यिकांनी या घटनेचा निषेध केला आहे. साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक साहित्यिकांनी तीव्र शब्दात या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.

नयनतारा सहगल यांनी साहित्य संमेलनात करण्याचे भाषण आयोजकांना पाठविले होते. त्यात लेखन स्वातंत्र्य, असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर परखड भूमिका त्यांनी मांडली आहे. शिवाय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्र आणि मराठीबद्दल असलेले नाते सांगितले आहे,

“माझ्याकरता हा एक भावनिक क्षण आहे. मला असे वाटते आहे की, ज्यांचे नाव आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहे, ते मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे (माझे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे त्यांचे जवळचे स्नेही आणि सहकारी होते), या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले सर्व थोर मराठी साहित्यिक आणि ज्यांच्या लेखनामुळे भारतीय साहित्य नावाचे महान सृजनात्मक कार्य समृद्ध झालेले आहे, असे सर्व संमेलनांमध्ये सहभागी झालेले सगळेच लेखक, या सर्वांच्या छायेत मी आज उभी आहे. माझ्याकरता हा क्षण भावनिक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझे वडील रणजीत सीताराम पंडित यांच्याकडून माझे स्वतःचे महाराष्ट्राशी असलेले नाते. त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते.”

साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्षांना संदेश पाठवून संताप व्यक्त केला आहे, “वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्या वाचून धक्का बसला. निमंत्रण रद्द करण्याआधी तुम्ही आमच्याशी बोलले असते तर आम्ही, निदान मी तरी तुम्हाला विरोध केला असता. अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नसता हे वेगळे! तुमच्याबरोबर निष्कारण आम्हीही झोडपले जात आहोत. घेतलेला निर्णय धिक्कार करावा असाच आहे.”

जेष्ठ साहित्यिक आणि माजी संमलेनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “निमंत्रण देऊन रद्द करण्याची भूमिका मराठी सभ्यतेला, संस्कृतीला शोभणारी नाही. नयनतारा सहगल या अस्सल भारतीय आणि मराठी आहेत. प्रतिभावंत लेखिकेच्या इंग्रजी लेखनाचा मुद्दा पुढे आणून मराठी संस्कृतीचा अपमान करणारी राजकीय पक्ष आणि संयोजकांची भूमिका सर्व संदर्भात चुकीची आहे. पंडित नेहरूंचे नातेसंबंध आणि पुरस्कार वापसीचा मुद्दा या प्रकरणामध्ये नंतर जमा झालेले आहेत. पण मूळ मुद्दा राजकीय पक्ष आणि संघटनांचा दबाव आणि दबावाला बळी पडलेले कमजोर संयोजक हेच आहे.

साहित्य संमेलन हे संस्कृतीचा गाभा आहे. सत्याची पूजा आहे. सत्याचा मुर्दा पाडून संमलेन साजरे करणे हा संस्कृतीचा द्रोह आहे. राजकीय पक्षाचा स्वार्थ सत्याच्या संदर्भात मर्यादित असतो. संस्कृतीच्या पाईकांनी निर्भय राहून सत्याची पूजा बांधली पाहिजे. संयोजकांनी कुठल्याही झुंडशाहीला घाबरण्याचं कारण नव्हतं. संमेलन उधळून लावण्याची भाषा ही संस्कृतीचा गळा दाबण्याचा प्रकार असतो. संस्कृतीचे मारेकरी कधीही समर्थनीय नसतात. संमेलनाचे निमंत्रण मला आणखी आले नाही. पण आले तरी मी जाणार नाही.”

91 व्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आयोजकांची खरडपट्टी काढली आहे. आयोजक तुम्ही चुकत आहात, असे त्यांनी आयोजकांना कडक शब्दात फटकारले आहे. ते संमेलनात व्यासपीठावरून भाषणातून या घटनेचा निषेध नोंदवून आपले परखड भाष्य करणार आहेत.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, “नयनतारा सहगल या महाराष्ट्राशी निगडित लेखिका आहेत. संमलेनाला बोलावून नंतर येऊ नका असे सांगणे निषेधार्य बाब आहे. आयोजकांना मुळात त्यांचे कर्तृत्व आणि लेखन याविषयी नीट माहिती नाही. त्यांच्या भाषणाचा मसुदा वाचला आणि भाषणाच्या भीतीपोटी येण्यास नकार कळवला, हीच खरी सत्यता आहे. लेखकाच्या भूमिकेविषयी आणि व्यक्तिस्वातंत्र्याविषयी प्रत्येकाने आग्रहपूर्वक विचार केला पाहिजे आणि लिहिणाऱ्या प्रत्येकाने संमलेनावर बहिष्कार घातला पाहिजे.

साहित्य महामंडळाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी महामंडळावर वाचक-लेखकांनी दबाव आणला पाहिजे. मुळात हे साहित्य संमलेन करण्यासाठी जेवढा पैसा खर्च केला जातो तेवढ्या पैशातून मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातील. आता सर्व विचारी मंडळी एकत्र येऊन नयनतारा सहगल यांना सन्मानपूर्वक बोलविले पाहिजे. म्हणजे महामंडळातल्या लेखकांना थोडेतरी शहाणपण सुचेल.”

प्रसिद्ध कथाकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. आसाराम लोमटे यांनी पत्र लिहून निषेध नोंदवला आहे. “जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून देण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आले या कृतीचा मी निषेध करतो. झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन केलेली ही कृती उद्वेगजनक, संतापजनक आणि निषेधार्हच आहे. एका जेष्ठ लेखिकेचा उपमर्द होत असताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाने कणखर आणि रोखठोक भूमिका घ्यावी, हे संमेलनच रद्द करून टाकावे अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. व्यक्तीशः यवतमाळ येथील साहित्य संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मी घेतला आहे.”

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठीतील सशक्त कवी श्रीकांत देशमुख फेसबुवर लिहितात,

“म. चक्रधर, ज्ञाना, नामा, तुकोबा, जोतीराव, महर्षी शिंदे, बाबासाहेब या समग्र परंपरेचा सन्मान जपायचा असेल तर संमेलनाला जाऊ नये. असे आव्हान आवाहन आहे. नयनतारा सहगल यांना ज्या रीतीने अवमानित करण्यात आले आहे, त्याचा मी निषेध करतो आणि निमंत्रित म्हणून संमेलनावर बहिष्कार टाकतो.”

जेष्ठ साहित्यिक, कवी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी फेसबुकवर निषेध नोंदवला आहे. “यवतमाळचं संमेलन रद्द करावं. मी निमंत्रित वक्ता आहे. तथापि, माझा संमेलनावर बहिष्कार!”

प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी अतिशय उद्विन्ग होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,

“या थोर सांस्कृतिक व्यवस्थेचा आपण छोटासा का होईना, पण एक घटक आहोत याचा अभिमान वाटावा असे क्षण फार कमी वेळा वाट्याला आलेत; लाज वाटावी, शरमेनं मन काळवंडून जावं असं कैकदा घडतंय. पुनः पुन्हा… आताही…”

प्रसिद्ध कवी आणि खेळ मासिकाचे संपादक मंगेश नारायणराव काळे फेसबुक पोस्टद्वारे लिहितात, “राज्यकर्ते, नी राजकारणी यांच्या दबावाला बळी पडून जर साहित्य संस्था असे पळपुटे धोरण स्वीकारत असेल तर हे आजच्या राजकारण संस्कृतीची अधोगतीच म्हणावी लागेल. कवी, लेखकांनी जर एकजुटीने बहिष्कार घातला तर संमेलन रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर नी अर्थातच राज्यकर्त्यांवर येईल. नी मराठी लेखकाची सशक्त भूमिका समोर येईल. हीच वेळ आहे. विचार करा. साहित्य संमेलनातील प्रभा गणोरकर यांची मुलाखत मी, डॉ. कविता मुरूमकर घेणार होतो. ती आम्ही रद्द करीत आहोत. निषेध.”

युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी वीरा राठोड सोशल मीडियावर लिहितात, “नयनतारा, तुमच्या निमित्ताने कळून आले की, अजूनही सच्चा लेखकाची भीती वाटते व्यवस्थेला. कलम की ताकत जिंदा है.”

संमेलनाला निमंत्रित असलेले जेष्ठ पत्रकार आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी निमंत्रण वापसीसाठी आयोजकांना पत्र लिहिले आहे. “या संमेलनातील ‘माध्यमांची स्वायत्तता: नेमकी कुणाची?’ या टॉक शोमध्ये बोलण्यासाठी मला निमंत्रित केले आहे. या सन्मेलनाच्या उदघाटक नयनतारा सहगल होत्या. निमंत्रण पत्रिकेत त्यांचा ‘ज्येष्ठ भारतीय लेखिका’ असा उल्लेख आहे. त्यांचे निमंत्रण का रद्द करण्यात आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. ते निषेधार्ह आहे.

नयनतारा सहगल यांचे संमेलनातील भाषण सोशल मिडियातून प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी देशातील सरकार पुरस्कृत असहिष्णुता आणि सामाजिक समभावाला छेद देणाऱ्या व्यवहारावर नेमके बोट ठेवले आहे. ती आजची गरज आहे. नयनतारा सहगल यांच्या भाषणातील मुद्दे टॉक शो मधील माझ्याही बोलण्यातून अधिक कठोरपणे येतील. हे लक्षात घेऊन माझे निमंत्रण रद्द करावे. यास निमंत्रण वापसी समजावे.

जेष्ठ पत्रकार-लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी संमलेनाला जाण्याइतका निर्लज्ज नाही, अशा कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “एवढं सगळ होवून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आहे, एवढे कारण देवून तेथे जाण्याइतका मी निर्लज्ज नाही. मी जाणार नाही. बस एवढच!”

जेष्ठ पत्रकार आणि लेखक संजय आवटे लिहितात, “मी या संमेलनातील नियोजित वक्ता आहे. नयनतारा सहगल या संमेलनाचे उद्घाटन करत असल्याने, या संमेलनाविषयी आत्यंतिक औत्सुक्य होते. प्रत्यक्षात मात्र आयोजकांनी नयनतारांचे आमंत्रण रद्द केल्याने मला धक्का बसला आहे. साहित्यिकांनी भूमिका घेण्याची आवश्यकता असताना, आजही आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात लेखक-कवी बसले आहेत. अशावेळी नयनतारांनी उद्घाटक म्हणून भूमिका मांडणे हीच एकमेव आशा होती. त्यांचे जे भाषण ‘बीबीसी’ने दिले आहे, ते पाहाता, हीच आशा त्यातून अधोरेखित होत आहे.

लोकशाहीवर दररोज हल्ला होत असताना आणि विचार आक्रसत असताना, नयनतारांनी केलेली मांडणी आत्यंतिक महत्त्वाची आणि अपरिहार्य अशी आहे. माझ्या ताज्या पुस्तकात- ‘वी द चेंज- आम्ही भारताचे लोक’- मी जी मांडणी केली आहे, तिच्याशी नातं सांगणारी भूमिका नयनतारांची आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ अशी ख्याती बुलंद करण्याची वेळ आज आलेली असताना, साहित्य संमेलनांचे आयोजक शेपूट घालणार असतील, तर अशा अखिल भारतीय संमेलनांशी माझेच काय, इथल्या भारताच्या लोकांचेही काही नाते असू शकणार नाही.

आत्यंतिक क्लेशपूर्वक मला हा निर्णय जाहीर करावा लागतो आहे. मात्र, दांभिकांच्या पंढरीत नाही, याचा मला आनंद असेल. भोंदू गांडूळांच्या जमावाला आता तरी सांगू या- साध्याच माणसांचा एल्गार येत आहे!”

साहित्य संमेलनातील एका परिसंवादात नियोजित वक्ता असणारे लेखक डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी निषेध नोंदवून संमेलन रद्द करण्याची भूमिका मांडली आहे,

“नयनतारा सहगल या संमेलनाचे उदघाटन करणार होत्या. मात्र आयोजकांनी नयनतारांचे आमंत्रण रद्द केल्याने मला धक्का बसला आहे. त्यांचे विचार दडपण्याचाच हा प्रयत्न दिसतो. उद्या प्रत्येकाचे भाषण यांच्याकडून तपासून घेण्याची वेळ येईल किंवा मध्येच बोलणे थांबवले जाईल. अशा संमेलनात सहभागी होणे न पटणारे आहे. त्यामुळे मी या संमेलनात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय घेतला आहे. खरेतर महामंडळानेच आता हे संमेलन रद्द करायला हवे.”

कवी संमेलनाला निमंत्रित कवी असलेले रेणू पाचपोर यांनी आयोजकांचा निषेध करून संमलेनाला जाणार नसल्याचे फेसबुकवर लिहिले आहे, “यवतमाळ संमेलनात निमंत्रित कवी होतो. ‘निमंत्रित’ शब्दाची धसकी व भीती वाटावी एवढी आयोजकांनी उद्घाटक नयनतारा सहगल यांच्याबाबत अपमानास्पद कृती केली आहे. निषेध. मी संमेलनावर बहिष्कार टाकत आहे.”

लेखक समीक्षक डॉ. गणेश मोहिते यांनी संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. “जेष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबातून आलेल्या व लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणाऱ्या, व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या बंडखोर जेष्ठ लेखिका आहेत. आणीबाणीच्या वेळी नात्यातील व्यक्ती पंतप्रधान असतांना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती.

देशात 2014च्या सत्ता बदलानंतर वाढलेल्या सामाजिक असहिष्णुतेविरुद्ध पहिला आवाज त्यांनी उठवला होता. अशी पार्श्वभूमी असणाऱ्या लेखिकेला संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलवणे हे एका अर्थाने संमेलनाचा मान वाढविणारी घटना होती. परंतु स्मरणिकेत छापण्यासाठी कदाचित उद्घाटकीय भाषण प्राप्त झाल्यानंतर ते वाचले गेले असावे आणि न पेलणाऱ्या या भाषणांवर आयोजकीय चर्चा होवून ‘सत्ताधारी’ स्वागताध्यक्षाची अडचण नको. निवडणुकीचे वर्ष आहे; हे परवडणारे नाही. म्हणून भाडोत्री मराठी भाषा प्रेमी संघटनावाले आणि शेतकऱ्यांच्या नावावर उखळ पांढरे करु पाहणारे चार दोन ‘दलाल’ हाताशी धरुन विरोधाची स्क्रिप्ट लिहिली गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यास पुरेशी जागा आहे. त्यामुळे आयोजकांनी विरोध होताच निमंत्रण रद्दबातल करण्याचा ईमेल करणे, हे या डावाचा भाग आहे; असे वाटून जाते.

शेवटी आयोजकांची अडचण असते. त्यांना विनाविघ्न संमेलन उत्सवी स्वरुपात पार पाडायचे असते. परंतु इतर वाद वेगळे आणि हा प्रकार वेगळा आहे. हे भान त्यांना असायला हवे होते. आपण नेमकं काय करत आहोत हेच त्यांनाही दबावात उमगले नसावे. परंतु आता तरी त्यांनी शांतपणे विचार करुन हे ‘संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे’.

कोणत्याही जेष्ठ लेखक, विचारवंताचा अपमान करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे म्हणून दिलगिरी व्यक्त करावी व नयनतारा सहगल यांना पुन्हा उद्घाटक म्हणून सन्मानाने पाचारण करावे. त्यांचे खणखणीत उद्घाटकीय भाषण ऐकण्याची संधी महाराष्ट्राला द्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. असे होत नसेल तर या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून मी ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादात निमंत्रित आहे. या नात्याने या संमेलनावर बहिष्कार टाकतो आणि या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.”

निमंत्रित असलेले लेखक-पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी संमेलनातून माघार घेतल्याचे संयोजकांना कळवले आहे,

“नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या यवतमाळ संमेलन आयोजकांचा त्रिवार निषेध. एका परिसंवादात मी सहभागी होणार होतो. परंतु आता मी सहभागी होणार नाही. तसे मी आयोजकांना कळवले आहे.”

प्रसिद्ध कवी केशव खटिंग म्हणतात, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या संयोजक संस्थेचा कडीचोट निषेध. इतके रताळे असाल असं वाटलं नव्हतं. निषेध.”

नांदेडचे प्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल यांचीही महामंडळाच्या या कृतीवर कडाडून हल्ला चढवला आहे, “भारतातल्या सांस्कृतिक इतिहासातला कालचा दिवस हा अत्यंत दु:खद म्हणायला हवा. कारण यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ‘प्रसिध्द भारतीय लेखिका’ असे विशेषण वापरून ज्यांना सन्मानाने बोलवण्यात आले होते, त्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण परत घेणे ही कृती अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे.

यानिमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रावरचा राजकीय प्रभाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. एखाद्या राजकीय संघटनेने अ-मराठी लेखिका म्हणून विरोध करणं जितकं हास्यास्पद आहे, त्याहीपेक्षा संयोजन समितीने कोणत्याही राजकीय प्रभावापुढे शरणागती पत्करणंसुद्धा आत्यंतिक धोकादायक आहे. राष्ट्राराष्ट्रातील आणि भाषेभाषेतील सांस्कृतिक स्तरावरची देवाणघेवाणीची प्रक्रिया थांबविण्याचा आणि एकूणच सांस्कृतिक भोवताल दुषित करण्याचा हा निंदनीय प्रकार आहे.

नयनतारा सहगल या भारतातल्या महत्त्वाच्या लेखिका आहेत – ज्यांचा मराठी भाषेशी आणि संस्कृतीशीही जवळचा संबध आहे. एक धाडशी आणि विवेकी विचारवंत ही त्यांची ओळख आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार शासनाला परत पाठवून वर्तमान भारतातल्या असहिष्णूतेचा जाहीर धिक्कार केला होता. ‘भूमिका घेणं म्हणजे काय?’ हे त्यांनी आपल्या कृतीतून देशाला दाखवून दिले होते. विशेष म्हणजे हा पुरस्कार परत करताना त्यांनी ज्या गोष्टींची नोंद केली होती- त्यामुळे शासन दरबारी नक्कीच हादरे बसले होते. मुळात त्या काही सध्याच्या सरकारविरोधातच बोलल्या असे नाही. याहीपूर्वी आणीबाणीच्या काळातही त्यांनी निषेध केला होता. लिहिणाऱ्या माणसांचा एक निर्भयशील उच्चार म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवे. असे असताना त्यांच्या टीकेला घाबरून पळ काढणे हे केवळ आणि अशोभनीय आहे.

यंदाच्या साहित्य संमेलनात अनेक चांगल्या गोष्टी घडून ते वादाशिवाय पार पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. – म्हणजे अरुणा ढेरे यांची अध्यक्ष म्हणून निवड किंवा अ-राजकीय व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन किंवा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक लेखकांनी मानधन न स्वीकारण्याची घेतलेली स्वागतशील भूमिका वगैरे, पण असे घडू शकले नाही.

नयनतारा सहगल यांचे भाषण पोहोचताच संमेलनकर्त्याचे धाबे दणाणले. त्यांचे भाषण उपलब्ध आहे आणि ते बरेच टोकदार आहे हे खरे, पण त्यामुळे एवढे हादरून जाण्याचे कारण काय? संयोजकांनी या गोष्टीला सामोरे जायला हवे होते. चांगल्या अर्थाने जर कुणी खडे बोल सुनावत असेल तर तर ती आपल्या निकोप अशा सामाजिक आणि सांस्कृतिक हिताचीच गोष्ट आहे, इतकी सकारात्मकता आयोजक संस्थेने आणि अनुदान देणाऱ्या शासनाने दाखवायला हवी होती. मात्र सत्ताधाऱ्यांना याबाबी अमान्य का असतात? ते कळत नाही. आपण धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात आहोत की, पारंपरिक सरंजामशाहीत हे कळणे अवघड झाले आहे. लोकशाहीप्रधान समाजव्यवस्थेत बोलण्याचा/ व्यक्त होण्याचा मुलभूत अधिकारच नाकारला जात असेल, तर ही चिंताजनक घटना मानायला हवी. (अर्थात यापूर्वीही असे अनेकदा घडले आहेच.) विरोधी विचाराचे/ टीकेचे समूळ उच्चाटन करण्याचा हा अत्यंत विघातक प्रकार आहे. निमंत्रण परत घेण्याचा मेल करणाऱ्या कार्याध्यक्षाचा बोलविता धनी कोण? याचा शोध घ्यायला हवा आणि जर याचा संबंध थेट राजसत्तेशी जोडला गेला तर ही गोष्ट गंभीरतेने घेतली गेली पाहिजे.

….तर असो यंदाच्या साहित्य संमेलनात मी निमंत्रित वगैरे नसल्यामुळे संमेलनस्थळी माझ्या जाण्याच्या वा न जाण्याच्या निर्णयाला अथवा बहिष्काराला तसा फारसा अर्थ नसला तरी या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम लेखिकेचा अपमान हा लेखक म्हणून माझाही अपमान आहे, अशी माझी याक्षणी भावना आहे. विचारस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या या घटनेचा, महामंडळाच्या अविचारी पदाधिकाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो!”

संमेलनाला निमंत्रित असलेले लेखक बालाजी सुतार यांनी सोशल मीडियावर निषेध नोंदवून जाणार नसल्याचे सांगितले आहे,

“संसदेतल्यांपासून गावगन्ना सटरफटर नगरसेवकांपर्यंत कुणीही टीका केली तरी कुणाला चिंता वाटत नाही. एक साहित्यिक बोलतो तेव्हा घाबरून निमंत्रण रद्द होतं. ये डर कायम रहना चाहिए. मी निमंत्रित होतो. आता संमेलनाला जाणार नाही. कडेकोट बहिष्कार! आयोजक संस्थेचा कडकडीत निषेध.”

मुक्त शब्द मासिकाचे संपादक येशु पाटील म्हणतात, “नयनतारा सहगल यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुक्त शब्द आणि शब्द पब्लिकेशन तर्फे निषेध!”

निमंत्रण मिळालेले तरुण कवी आणि वाघूर दिवाळी अंकाचे संपादक नामदेव कोळी यांनी संमेलनावर बहिष्कार टाकलाय, “मी काही सेलिब्रेटी लेखक-कवी नाही. कविता वाचनासाठी यावेळी पहिल्यांदाच निमंत्रण मिळालंय. माझ्या कोणत्याही मंचावरील सहभागाने खरं तर काहीच फरक पडणार नाही. पण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा निमंत्रण नाकारुन जो अपमान केलाय, त्याचा निषेध म्हणून मी या संमेलनाचा बहिष्कार करतो.”

यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावर साहित्यिकांनी एकजूट होऊन बहिष्कार टाकला आहे. पुरस्कार वापसीच्या वेळी अनेक साहित्यिक अशाच पद्धतीने एकत्र आले होते, त्याची आठवण यानिमित्ताने झाली. साहित्य महामंडळ काय भूमिका घेते आणि लेखक दबावगट करून संमेलन रद्द करण्यास भाग पडतात काय? किंवा अवघ्या काही दिवसांवर आलेले संमेलन होणार की नाही, याबाबत आता अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. प्रत्येक साहित्य संमेलनाला कोणत्या ना कोणत्या कारणाने लागलेले वादाचे ग्रहण यावर्षीही कायम राहिले, हे मात्र निश्चितच मराठी साहित्य विश्वाची मान खाली घालवणारी घटना आहे.

मोतीराम पौळ, मुक्त पत्रकार, पुणे

(नोट – ब्लॉगमधील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.