हल्ला सर्वोत्तम संरक्षण आहे!

डॉ. अनिरुद्ध डी. जोशी, ज्येष्ठ पत्रकार काळ कोणालाही क्षमा करत नाही आणि काळाला कुणीही वाकवू शकत नाही, हे एक अबाधित सत्य आहे. प्रत्येक मनुष्याच्या, शहराच्या, उद्योगव्यसायाच्या, राष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय संघाच्या कार्यामध्ये नेमक्या संधी उचलाव्या लागतात आणि उचित संधी सोडून देऊन चालत नाही. कारण एकदा का उचित संधी व उचित वेळ हातातून गेली की मग पुढे …

, हल्ला सर्वोत्तम संरक्षण आहे!

डॉ. अनिरुद्ध डी. जोशी, ज्येष्ठ पत्रकार

काळ कोणालाही क्षमा करत नाही आणि काळाला कुणीही वाकवू शकत नाही, हे एक अबाधित सत्य आहे. प्रत्येक मनुष्याच्या, शहराच्या, उद्योगव्यसायाच्या, राष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय संघाच्या कार्यामध्ये नेमक्या संधी उचलाव्या लागतात आणि उचित संधी सोडून देऊन चालत नाही. कारण एकदा का उचित संधी व उचित वेळ हातातून गेली की मग पुढे भविष्यात कशाला सामोरे जावे लागेल हे कुणीच सांगू शकत नाही.

या भारवर्षाने आपल्या प्रचंड मोठ्या आणि प्रदीर्घ इतिसाहासामध्ये अनेक शत्रू पाहिले, कधी त्यांच्या आक्रमणांना व्यवस्थित परतवून लावले, तर कधी त्या आक्रमणांनी भारताला गुलाम करुन ठेवले.

सध्याची भारताची आर्थिक, राजकीय (आतंरराष्ट्रीय) आणि सैनिकी सत्ता पाहता, कुठलेही मोठ्यातील मोठे व सशक्त राष्ट्रसुद्धा भारतावर आक्रमण करुन भारताला गुलाम बवनू शकणार नाही हे नक्की. परंतु तशी स्वप्ने कुणी पाहात नसेल असे मानणे हा मूर्खपणा असेल.

चीन सध्या ज्या आर्थिक संकाटातून जात आहे आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जी राक्षसी महत्त्वकांक्षा आहे ती पाहता, चीनची उघड युद्ध करण्याऐवजी अनधिकृत व गुप्तपणे कारवाया करण्याची मन:स्थिती नक्कीच असणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक राष्ट्र, आपल्या विरोधी राष्ट्रातील अनेक संधीसाधू राजकारण्यांना व फुटीर गटांना गुप्तपणे आर्थिक सहाय्य आणि शस्त्रास्त्र पुरवठा नेहमीच करत असते. चीन अगदी पुरातन काळापासून अशा गोष्टींमध्ये अत्यंत तरबेज आहे.

चीनमध्ये सर्वत्र अशांतता आहे. पाकिस्तानमध्ये तेथील शासकांविषयी प्रचंड संताप आहे. पाकिस्तानचे शासक सदैव पाकिस्तानी लष्कराच्याच ताब्यात असते, अगदी लोकशाही दिसत असली तरीसुद्धा.

भारत- अमेरिकेची मैत्री सर्व स्तरांवर वाढत आहे. अमेरिकेच्या भारतावरील प्रेमामुळे नव्हे तर अमेरिकेच्या धोरणांसाठी ही मैत्री अनुकूल आहे म्हणून. असो! परंतु भारत-अमेरिका मैत्री कमीत कमी 15 वर्षे तरी टिकणारच आहे.

चीन आणि अमेरिकेमध्ये अनेक स्तरांवर आर्थिक व राजनैतिक युद्ध चालूच आहे आणि चीनला पॅसिफिक महासागरावर आपला शिक्का मारायचा आहे. त्याच्या आड येणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया आहेत.

चीनला स्वत:ची अधोगती थांबवण्यासाठी, भारताचे आर्थिक खच्चीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे वाटत आहे आणि त्यासाठीच भारताला अस्थिर, असुरक्षित आणि अशांत परिस्थितीला नेणे चीनला गरजेचे आहे. यासाठी चीन पाकिस्तानमधील भारतविरोधी गटांना मजबूत सहाय्य पुरवित आहे.

पुलवामा क्षेत्रात घडलेली घटना ‘एक तत्कालिन घटना’ म्हणून एक भ्याड कृत्य म्हणून सोडून देऊन चालणार नाही. भारतीय सैनिक हे काही बळी द्यायचे बकरे नाहीत, तर भारतासाठी प्राण त्यागणारे भारतीय सैनिक श्रेष्ठ हुतात्मा आहेत. आणि हे नीट जाणाणाऱ्या भारतीय जनतेमध्ये सर्वत्र या घटनेमुळे शोक आणि तीव्र संताप आहे.

भारतातील लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. यामुळे भारतातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तानशी युद्ध छेडणार नाही, अशी खात्री चीन आणि पाकिस्तानला वाटत आहे.

पाकिस्तानशी युद्ध घोषित करण्याची काहीच आवश्यकता नाही हे खरे, परंतु पाकिस्तानशी अत्यंत कठोरपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे.

पाकिस्तानचा विशेष दर्जा काढून घेतला, चांगलेच झाले! परंतु त्यानेसुद्धा विशेष काही घडणार नाही. कारण पाकिस्तान हा एक मुरलेला भिकारी आहे आणि त्याचबरोबर पैशांसाठी स्वेच्छेने वेश्यावृत्ती स्वीकारुन, कुणाही श्रीमंत देशाबरोबर शय्यासोबत करण्याची पाकिस्तानची वृत्ती आहे.

पाकिस्तानी जनतेला भारताचा बागुलबुवा दाखवून स्वत:ची सत्ता कायम राखण्याची सवय पाकिस्तानी लष्कराला जडलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान असे हल्ले करतच राहणार.

आता वेळ आली आहे पाकिस्तानच्या मोजक्या ठिकाणांवर नेमके हल्ले चढवून आणि सीमेवरील पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत आणि अनधिकृत तळ बेचिराख करुन पाकिस्तानला परत एकदा शरण आणण्याची. इथे इस्रायलच्या मार्गाने जाणे आवश्यक आहे. इस्रायलचे सहाय्य घेणेही आवश्यक आहे. इराण भारताचा मित्र आहे. अगदी पुरातन काळापासून. आणि तोच पाकिस्तानचा शत्रूही आहे. ही जशी भारतासाठी सहय्याची गोष्ट आहे, तशीच थोडी अडचणीचीही गोष्ट आहे.

कारण पाकिस्तानने आक्रमण करुन जिंकलेल्या बलुचिस्तानला स्वतंत्र करणे आवश्यक आहे. बलुचिस्तानची सीमा ठरवताना भारताला इराणचे हितसंबंध लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण बलोच नेत्यांना इराणचाही काही भाग हवा आहे. येथे भारताने नीट मध्यस्थी करुन बलोच व इराण या दोघांचेही हितसंबंध नीट ठेवणे गरजेचे आहे. कारण इराणच्या मदतीशिवाय बलुचिस्तानचा प्रश्न सुटणे शक्य नाही.

पाकिस्तानमधील 80 टक्के भूमिगत खनीज संपत्ती बलुचिस्तानमध्ये आहे आणि बलुचिस्तानला आपले स्वातंत्र्य परत मिळवायचे आहे.

1971 साली ज्याप्रमाणे ‘ब’ या अक्षराने सुरु होणाऱ्या बांगलादेशला स्वतंत्र होण्यास सहाय्य करुन भारताने पाकिस्तानची अर्धी ताकद संपवली, तसेच आता पुन्हा एकदा ‘ब’ अक्षराने सुरु होणाऱ्या बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास सहाय्य करुन पाकिस्तानला कायमचे दरिद्री बनवणे आवश्यक आहे. आणि असे करण्यासाठी आवश्यक असणारी आंतरराष्ट्रीय स्थिती सध्या भारताला अनुकूल आहे.

अमेरिका आणि रशिया या दोघांचीही भारताशी मैत्री आहे. रशियाने धोरण म्हणून पाकिस्तान व चीनला थोडेसे जवळ केले असले, तरीदेखील रशियाच्या मनात सदैव चीनच्या विस्तारवादाच्या धोरणाची पूर्णपणे जाणीव आहे आणि रशियाची शकले कशी पडली, हेदेखील रशिया नीट जाणतो.

सौदी अरेबिया पाकिस्तानला सहाय्य करत असला, तरी सौदी अरेबियाला भारताशी संबंध बिघडवणे जराही परवडणार नाही. कारण त्यांचे पेट्रोडॉलर अस्थिर झाले आहेत.

अशा आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे अमेरिका, इस्रायल, इराण, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, तैवान, मंगोलिया, म्यानमार, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स अशा विविध दिशांना तोंडे असणाऱ्या आपल्या मित्रराष्ट्रांचे हितसंबंध नीट राखून भारत पाकिस्तानची आकृती नक्कीच आवश्यक तेवढी कमी करु सकतो.

हे जर आता घडले नाही, तर निवडणुकांनंतर घडणे शक्यत नाही. कारण पुढील येणाऱ्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. युरोपीय महासंघाचे भविष्य ठरवणाऱ्या निवडणुका, चीनमध्ये होऊ घातलेला सत्तापालट, इस्रायलला घ्यावी लागणारी आक्रमक भूमिका आणि आफ्रिकन देशांमध्ये पेटणारे संघर्ष.

असो! शेवटी धोरण राज्यकर्तेच ठरवणार आहेत. मी केवळ आंतरराष्ट्रीय स्थितीचा एक साधासुधा निरीक्षक आहे. परंतु एवढे मात्र नक्ती की जर भारतीय जनतेची खात्री पटली नाही की ‘पाकिस्तानला नीट धडा शिकवला गेला आहे’, तर पुढे अनेक अनर्थ होतील आणि असे होऊ नये म्हणून आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

 

(ब्लॉगमधील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)