नवी दिल्ली : भारतीय वाहनधारकाला पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळत नसल्याने तोही इतर पर्यायांकडे वळला आहे. त्यानेही इलेक्ट्रिक व्हेईकलची वाट धरली आहे. पण तरीही वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होतील अशी आशा आहे. आता ही आशा भाबडी आहे की, केंद्र सरकार आश्वासनाप्रमाणे खरेच इंधन दराबाबत दिलासा देतील हे लवकरच कळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कच्चा तेलाने (Crude Oil Price) मान टाकली आहे. कच्चा तेलाच्या किंमती सातत्याने घसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आतबाहेर खेळत आहे. त्यामुळे भारतीय तेल विपणन कंपन्यांचा (OMCs) मोठा तोटा भरून निघाला असणार, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज थोडीच आहे. तेल विपणन कंपन्या भविष्यात किंमती वाढतील अथवा कमी होतील, या अंदाजानेच पूर्वीच कमी किंमतींना सौदा करतात. विक्री, व्यवस्थापन आणि विपणनाचे हे कौशल्य वापरुनच कंपन्यांना फायदा होतो. आता काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील अशी आशा आहे .