RBI : तूर्तास EMI मध्ये दिलासा नाहीच, रेपो दरात कोणताही बदल नाही

चलनविषयक धोरण समितीची आज बैठक झाली. Rbi Governor Shaktikanta Das Press Conference Announcement Of Decisions taken by monetary policy committee

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:52 AM, 4 Dec 2020
RBI : तूर्तास EMI मध्ये दिलासा नाहीच, रेपो दरात कोणताही बदल नाही

नवी दिल्लीः पुढील काही महिने अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला आहे, ग्राहकांना स्वस्त ईएमआयची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची आज बैठक झाली. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीने घेतलेले निर्णय जाहीर केले. (Rbi Governor Shaktikanta Das Press Conference Announcement Of Decisions taken by monetary policy committee)

यंदा फेब्रुवारीपासून केंद्रीय बँकेने पॉलिसी रेट किंवा रेपो दरात 1.15 टक्क्यांनी कपात केल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या वेळी व्याजदरात मेमध्ये 0.40 टक्के आणि मार्चमध्ये 0.75 टक्के कपात करण्यात आली होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची बैठक 2 डिसेंबरपासून सुरू झाली. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या सदस्यांचे आभार मानले.

धोरण समितीची बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तो चार टक्के राहील. चलनविषयक धोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ईएमआय किंवा कर्जाच्या व्याजदरावर ग्राहकांना नवीन दिलासा अद्याप मिळालेला नाही. रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असल्याचे दास यांनी सांगितले. यासह बँकेच्या दरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते 4.25 टक्के आणि रोख राखीव प्रमाण तीन टक्क्यांवर स्थिर आहे. एसएलआर 18 टक्के आणि मार्जिनल स्थायी सुविधा (MSF) दर 4.25 टक्के आहे. महागाईची उच्च पातळी लक्षात घेता, पॉलिसी दर कायम ठेवण्याच्या निर्णयावर सर्व चलनविषयक धोरण समितीच्या सदस्यांनी निर्णय घेतला. हिवाळ्यात चलनवाढीचा दर कमी होण्याची अपेक्षा ठेवून आरबीआयने चलनविषयक धोरणात मवाळ भूमिका कायम ठेवली.

शक्तिकांत दास म्हणाले, ‘आम्ही अर्थव्यवस्थेत पुरेशी रक्कम उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करू. गरज पडल्यास आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू. पुढच्या तिमाहीत देशाच्या जीडीपीतील वाढ सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने पुढील तिमाहीत जीडीपीच्या वाढीचा अंदाज 0.10 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ 0.70 टक्के होईल, असा अंदाज आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपी वाढ -7.5% राहील, अशी अपेक्षा आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, भारत सरकारने दिलेल्या मदत पॅकेजमधून भरपाई केली आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, वाणिज्य बँका 2019-20 साठी लाभांश देणार नाहीत. तिस-या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 6.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) यंत्रणा येत्या काही दिवसांत 24 तास/ सात दिवस उपलब्ध असेल. म्हणजेच आता तुम्हाला पैशांच्या व्यवहारासाठी बँक उघडेपर्यंत थांबण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या

EMI | ईएमआय आणखी तीन महिने पुढे ढकलण्याची सवलत, रिझर्व्ह बॅंकेचा मोठा दिलासा

20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची घोषणा