Silver Rules: दरवर्षी खरेदी केली 5 किलो चांदी, 20 वर्षांत 100 किलो जमा होईल घरात, कायदेशीर कारवाई होणार का?
थोडीथोडी करुन घरात एक किलो, 10 किलो, 100 किलो चांदी जमा झाली तर हा मालमत्ता लपवल्याचा ठपका ठेवत कारवाई होऊ शकते का? अशी मालमत्ता सरकार जप्त करू शकते का? तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो का?

Silver Rules for stock in home : अनेकांच्या घरात वारसाहक्काने सोने आणि चांदी आहे. त्यात मोड करुन अथवा नवीन भर घातली जाते. जर कोणी दरवर्षी 5 किलो चांदी खरेदी केली आणि ती मोडली नाही. तर 20 वर्षांनी घरात 100 किलो चांदी असेल.अशावेळी इतका मोठा खजिना बाळगणे हे बेकायदेशीर आहे का? हा मालमत्ता लपवण्याचा अथवा मौल्यवान धातुचा अधिकचा साठा केल्याचा ठपका ठेवण्यात येईल का? हा गुन्हा मानला जाईल का? हा प्रश्न सध्या चांदी खरेदीदारांमध्ये चर्चेत आहे. 100 किलो चांदी बाळगणे खरंच गुन्हा ठरतो का? काय आहे याचे उत्तर
घरात किती चांदी ठेवावी?
तर देशात चांदी अथवा सोने बाळगणे पूर्णपणे कायदेशीर आहे. पण त्यासाठीची कायदेशीर कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे अधिकृत ज्वेलर्स, डीलर अथवा योग्य स्त्रोताकडून दरवर्षी 5 किलो चांदी खरेदी केली आणि त्याच्या पावत्या तुमच्याकडे असतील तर सरकार तुम्हाला थांबवू शकत नाही. देशात एखाद्या व्यक्तीने किती चांदी बाळगावी यावर कायदेशीर बंधन नाही.
20 वर्षांत 100 किलो चांदी खरेदीवर कायदा काय सांगतो?
जर एखाद्याने 20 वर्षांत 100 किलो चांदी जमा केली तर हा व्यवहार कायद्याविरुद्ध नाही. पण ही चांदी तुम्ही स्मगलिंग अथवा बेकायदेशीररित्या मिळवली नाही हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी ही चांदी कुठून, कधी आणि कशी खरेदी केली याच्या पावत्या, कायदेशीर पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ही चांदी खरेदी करताना तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोतही सादर करावा लागेल. आयकर विभागाने पुरावे मागितले तर ते सर्व पुरावे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर याविषयीचे पुरावे नसतील तर मालमत्ता अघोषित उत्पन मानले जाऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते.
भांडवली नफ्यावर किती कर?
चांदी भांडवली मालमत्ता मानण्यात येते. चांदी जेव्हा विक्री करता तेव्हा नफा करपात्र असतो. 12 महिन्यांपूर्वी चांदीची विक्री केल्यास ते अल्पकालीन भांडवली नफा मानल्या जातो. उत्पन्नानुसार कर आकारला जातो. 12 महिन्यानंतर चांदी विकल्यास तो दीर्घकालीन भांडवली नफा मानला जाईल. त्यावर अंदाजे 20 टक्के कर आकारला जातो. खरेदी करताना गुंतवणूकदारांना सरकार जीएसटी आकारेल. पण विक्री करताना भांडवली नफ्यावर कर द्यावा लागेल.
चांदी खरेदीचा स्त्रोत जपून ठेवा
चांदी खरेदी करताना बिल, इनव्हॉईस, बँक व्यवहार रेकॉर्ड, आता युपीआयचे डिटेल्स याचा तपशील तुमच्याकडे नोंदवून ठेवा. रोखीने चांदी खरेदी करत असाल तर तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोतही उपलब्ध असावा नाहीतर चौकशी दरम्यान ही रक्कम काळेधन मानले जाऊ शकते. कोणतीही गुंतवणूक ही पारदर्शक असणे आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचे आहे.
हे ही लक्षात ठेवा
चांदीची किंमत तुमच्या घोषित उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर मग अडचण येऊ शकते. तुमच्या स्त्रोतावर आणि चांदीच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. आयकर अधिनियम कलम 69A नुसार पुढील कार्यवाही होईल. तुमची मालमत्ता जप्त होऊ शकते. कर अथवा दंडही लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक खरेदीचा पुरावा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
