राज्यात 1 हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड बनण्याची संधी; ऑनलाईन प्रशिक्षणही मिळणार

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:16 PM, 5 Mar 2021
राज्यात 1 हजार उमेदवारांना टुरिस्ट गाईड बनण्याची संधी; ऑनलाईन प्रशिक्षणही मिळणार
Tourist Guides

मुंबई : पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरू उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात 1 हजार टुरिस्ट गाईड (Tourist Guides) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतलाय. या योजनेंतर्गत राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (Opportunity For 1000 Candidates To Become Tourist Guides In The State; There Will Also Be Online Training)

उमेदवारांना प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार

या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यांना राज्यस्तरावर तसेच विविध पर्यटन ठिकाणी टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विभागाचा अनोखा प्रयत्न

महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृद्ध आणि आल्हाददायक अनुभव देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

काही अभ्यासक्रमासोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाईन कोर्स उपलब्ध

या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथून आपल्या सवडीनुसार हे ऑनलाईन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. http://iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध पर्यटन विषयाच्या महत्त्वाच्या काही अभ्यासक्रमासोबत सात मॉड्युल्ससह मूलभूत ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क 2 हजार रुपये असून, परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 1 हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवाराचे किमान दहावी श्रेणी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी

उमेदवारास ऑनलाईन प्रशिक्षण आणि परीक्षेनंतर इंटर्नशिपची संधी आणि वर्तन कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येईल. आयआयटीएफचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसाचे मूल्यांकन प्रशिक्षण घेतले जाईल आणि त्यानंतर “महाराष्ट्र पर्यटन परवानाकृत मार्गदर्शक” अशा स्वरूपात या उमेदवारास अंतिम प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील सर्व पर्यटनस्थळे (केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटनस्थळे वगळता) कोणत्याही पर्यटनस्थळांना सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 022-62948817 वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ICSI Recruitment 2021: यंग कंपनी सेक्रेटरीसाठी भरती, भारतीय कंपनी सचिव संस्थानमध्ये नोकऱ्यांची संधी

HPCL Recruitment 2021 | भारतातील ‘या’ आघाडीच्या तेल कंपनीत 200 अभियंत्यांसाठी भरती प्रक्रिया

Opportunity For 1000 Candidates To Become Tourist Guides In The State; There Will Also Be Online Training