SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दर महिन्याला मिळणार 15 हजार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ७,१५० अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे वाचा.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवार भरती २०२६ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता पात्र उमेदवारांना १५ जून २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२६ होती.
या भरती मोहिमेच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ७,१५० जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, बँकेच्या वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NAPS पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
- अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख: १९ मे २०२६
- अर्ज करण्याची नवीन अंतिम मुदत: १५ जून २०२६
- NAPS पोर्टल नोंदणी: apprenticeshipindia.gov.in
- अधिकृत अर्ज लिंक: sbi.co.in/careers किंवा sbi.bank.in/web/careers/current-openings
पात्रता आणि वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.
- वयोमर्यादा (१ एप्रिल २०२६ रोजी): उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे (उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९८ ते १ एप्रिल २००६ च्या दरम्यान झालेला असावा).
- वयोमर्यादेत सवलत: खुल्या (UR) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. तर SC, ST, OBC आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड प्रामुख्याने दोन टप्प्यांत केली जाईल.
१. ऑनलाइन लेखी परीक्षा: यामध्ये सामान्य/आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, संख्यात्मक योग्यता (Quantitative Aptitude), तर्क क्षमता (Reasoning Ability) आणि संगणकीय योग्यता (Computer Aptitude) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.
२. स्थानिक भाषा चाचणी: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी घेतली जाईल. (टीप: ज्या उमेदवारांनी १०वी किंवा १२वीच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रात स्थानिक भाषेचा अभ्यास विषय म्हणून केला आहे, त्यांना या चाचणीतून सूट मिळेल.)
विद्यावेतन (Stipend) आणि कालावधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही अप्रेंटिसशिप १ वर्षाच्या कालावधीसाठी असेल. या काळात निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. लक्षात ठेवा, हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने उमेदवारांना बँकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे डीए, एचआरए, पीएफ, पेन्शन किंवा वैद्यकीय लाभ यांसारखे इतर कोणतेही भत्ते मिळणार नाहीत.