निकालापूर्वीच आमदारासह कुटुंबातील अकरा जणांची हत्या

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:06 PM, 21 May 2019
निकालापूर्वीच आमदारासह कुटुंबातील अकरा जणांची हत्या

इटानगर : लोकसभा निवडणुकांसाठीचं सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर आता सर्वांना निकालांचे वेध लागले आहेत. कोण जिंकणार, कुणाचं सरकार येणार याकडे सध्या सर्व देशाचं लक्ष लागून आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशच्या राजकारणात एक धक्कादायक घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशच्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या कुटुंबातील 10 जणांची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली.

अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात आमदार तिरोंग अबो यांच्यासह अकरा जणांची निघृण हत्या करण्यात आली. नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड (एनएससीएन)च्या संशयित फुटीरतावाद्यांनी मंगळवारी हल्ला करत तिरोंग अबो यांच्यासह अकरा जणांची हत्या केली. यामध्ये तिरोंग अबो यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात तिरोंग अबो यांच्या कुटुंबासह काही सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला आहे. तिरोंग अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम येथील आमदार आहेत.

नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँडच्या काही फुटीरतावाद्यांनी तिरोंग अबो यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी पहिल्यांदा आमदार तिरोंग अबो यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांची हत्या केली. नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड हा एक नागा फुटीरतावाद्यांच्या बंडखोर समुह आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या हल्ल्याबाबत कठोर शब्दांत टीका केली आहे. “अरुणाचलचे आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या झाल्याच्या बातमीने एमपीपी अत्यंत दु:खी आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबाबत कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी करतो”, असं मुख्यमंत्री कोनराड संगमा म्हणाले.


अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री कुमार वाई यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. “मी या घटनेचा निषेध करतो. याप्रकारची घटना पहिले कधीही झालेली नाही. या प्रकरणाचा तपास होणे गरजेचं आहे. कुठल्यातरी राजकीय विरोधीने हो केलं आहे”, असा आरोप कुमार वाई यांनी केला.


गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही तिरोंग अबो आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. “इशान्य भारतातील शांतता भंग करण्याचा हा एक प्रयत्न आहे. गुन्हेगारांना माफ केलं जाणार नाही. तिरोंग अबो आणि त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत”, असं राजनाथ सिंह म्हणाले.