रात्रीच्या अंधारात 8 महिन्याच्या चिमुकल्याची चोरी, धाडसी अपहरणामुळे खळबळ!

कल्याणध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथे एका दाम्पत्याचे आठ महिन्यांचे बाळ चोरीला गेले. परंतु पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

रात्रीच्या अंधारात 8 महिन्याच्या चिमुकल्याची चोरी, धाडसी अपहरणामुळे खळबळ!
kalyan crime news
| Updated on: Nov 04, 2025 | 8:01 PM

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दाम्पत्याच्या आठ महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं. दाम्पत्य गाढ झोपेत असताना त्यांच्या कुशीतून या बाळाचे अपहरण करण्यात आले. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा प्रकार समोर येताच दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रं फिरवली आणि आवघ्या सहा तासांच्या आत चोरीला गेलेले बाळ दाम्पत्याला परत मिळवून दिले. पोलीस हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा ठावठिकाणा लागला. या प्रकरणी अक्षय खरे आणइ सत्या सविता खरे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरवलेले मुल परत मिळवून दिल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

गाढ झोपेत असतानाच चोरीला गेले बाळ

निलेश पोंगरे त्यांची पत्नी पूनम पोंगरे हे दाम्पत्य पुणे येथे राहत होते. ते कल्याण रेल्वे स्टेशनला आल्यानंतर आपल्या मुलांसह स्टेशनवरील पुलावर झोपले होते. गाढ झोपेत असताना एका तरुणाने आठ महिन्याच्या बाळाची चोरी केली. जाग येताच आपलं बाळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंचे दाम्पत्याने तत्काळ रेल्वे पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ शोध सुरू केला. बाळ चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिसानी तपास सुरु केला.

सोनवणे यांनी लगेच आरोपीला ओळखले

याच दरम्यान महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश सोनवणे यांनी सीसीटीव्ही पाहताच आरोपीला ओळखले. या आरोपीचे नाव अक्षय खरे असून काल मध्यरात्री सोनवणे यांनी अक्षय रस्त्यावर फिरत असताना त्याला हटकले होते. त्यावेळी अक्षयने घरी आत्याशी भांडण झाल्याने मी तक्रार करायला जातोय असे सांगितले होते. सोनवणे यांनी अक्षयला त्याच्या घरी नेऊन समज दिली होती. बाळाचे अपहरण करणारा हा अक्षयच असल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. सतर्कता दाखवत सोनवणे यांनी तत्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दोघांनाही ठोकल्या बेड्या

महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने तत्काळ अक्षयचे घर गाठले. त्यानंतर त्याच्या घरात बाळ आढळून आले. अवघ्या सहा तासाच्या आत बाळाची चोरी करणाऱ्या अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाळाची चोरी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता याचा तपास पोलिस करीत आहेत.