पोलिसांना उडवण्यासाठी स्फोटकं पुरली, नक्षलवाद्यांचा मोठा कट उद्ध्वस्त

नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात घडवून आणण्यासाठी जमिनीत स्फोटक पेरून ठेवली होती.

  • शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया
  • Published On - 15:19 PM, 25 Nov 2020
पोलिसांना उडवण्यासाठी स्फोटकं पुरली, नक्षलवाद्यांचा मोठा कट उद्ध्वस्त

गोंदिया: जिल्ह्याच्या देवरी तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्यातील कहुआभरा जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला. नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात घडवून आणण्यासाठी जमिनीत स्फोटक पेरून ठेवली होती. गोंदिया पोलिसांना माहिती मिळताच देवरी पोलीस आणि छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात जमिनीत पेरून ठेवलेली स्फोटक जप्त केली. नक्षलवाद्यांचा मोठा कट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Explosives Were Planted To Blow Up The Police, Big Plot Of Naxals Was Foiled)

महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षली सक्रिय असून, या ठिकाणी अनेक नक्षली कारवाया केला जात असतात. तर छत्तीसगड येथील गातापार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कहुआभरा जंगल परिसरात नक्षवाद्यांनी पोलिसांचा घातपात घडवून आणण्यासाठी स्फोटकं जमिनीत पुरून ठेवली असल्याची माहिती गोंदिया पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती, त्यानुसार गोंदिया जिल्हा पोलीस आणि राजनांदगाव येथील पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबविलं आणि जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटकं शोधून काढली.

यात बॅरेल भरलेली एक बंदूक, एक हॅड ग्रॅनेड, पाच इलेक्ट्रिक वायर, एक लहान सौर प्लेट, नऊ इलेक्ट्रिक टॅप रोल (ब्लॅक कलर स्मॉल), 23 बॅटरी (निप्पो), 05 सेलो टेप, 24 नवीन लहान फ्लॅशलाइट, 09 स्विचेस, नक्षल साहित्य कागद पत्रे, 200 लीटरचा निळा प्लास्टिक ड्रम, 10 बॅटरी (एसडब्ल्यूटी), एक चाकू (जुना तुटलेला), एक कनव्हर्टर बॉक्स (डीसी-चार्जर जुने) इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील साहित्यानं नक्षलवादी मोठा घातपात घडवला असता. तसेच एवढ्या स्फोटकांनी मोठी जीवितहानीसुद्धा झाली असती, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. हा भाग दोन्ही राज्याचा सीमावर्ती भाग असल्याने या ठिकाणी दोन्ही राज्यांच्या पोलिसांद्वारे सर्च मोहीम राबविण्यात येत असते.

संबंधित बातम्या

बिहारमध्ये नक्षलवादी हल्ला, गया जिल्ह्यात नियोजित पोलीस ठाण्याची इमारत स्फोटकांनी उद्ध्वस्त

डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक