दहावीत पैकीच्या पैकी गुण न मिळवल्याने मुलाचा पाय तोडला!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:24 PM, 8 May 2019
दहावीत पैकीच्या पैकी गुण न मिळवल्याने मुलाचा पाय तोडला!

तिरुअनंतपुरम : सध्या देशात वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच CBSE आणि ICSE बोर्डाचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये कुणी 100 पैकी 99 टक्के मिळवले, तर कुणी पैकीच्या पैकी गुण मिळवले. पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या या स्पर्धेत काही मुलं मागेही पडली. अशातच एका माथेफिरु पित्याने परीक्षेत सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण न मिळवल्याने मुलाच्या पायावर कुदळीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय तुटला आहे. केरळच्या किलिमनूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

केरळमध्ये सोमवारी SSLC बोर्डाचे म्हणजेच दहावीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्व विषयात ‘ए-प्लस’ न मिळवल्याने या क्रूर पित्याने आपल्याच मुलाला कुदळीने मारहाण केली. निकाल जाहीर झाल्याच्या काहीच तासात ही घटना घडली. साबू असे या 43 वर्षीय क्रूर पित्याचे नाव आहे.

केरळच्या किलिमनूर या गावात साबू पत्नी आणि त्याच्या मुलासोबत राहतो. तो आणि त्याची पत्नी शेतमजुरी करुन आपला उदर्निर्वाह करतात. दोन वेळेच्या जेवणासाठीही त्यांना खूप मेहनत करावी लागते. हे कष्ट आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नये, त्याने खूप शिकावं, मोठं होऊन चांगली नोकरी करावी यासाठी साबूने त्याला चांगल्या शाळेत टाकलं. मात्र, इतकं करुनही मुलगा दरवर्षी जेमतेम गुण मिळवायचा. त्यामुळे साबूने यावर्षी त्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची ताकीद दिली होती. मात्र, यंदाही मुलाने चांगले गुण न मिळवल्याने साबूला राग आला आणि त्याने कुदळ मुलाच्या पायावर घातली. यामध्ये त्याच्या मुलाचा पाय तुटला. त्यानंतर साबूने तेथून पळ काढला.

साबूच्या पत्नीने शेजारच्यांच्या मदतीने मुलाला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र त्याला आता कायमचं अपंगत्व आलं आहे. याप्रकरणी साबूच्या पत्नीने आणि मुलाने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी फरार साबूला मंगळवारी अटक केली. साबूला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साबूच्या मुलाने 10 पैकी 6 विषयांमध्ये ‘ए-प्लस’ मिळवलं होतं, मात्र सर्व विषयांमध्ये ‘ए-प्लस’ का नाही मिळवलं म्हणून या पित्याने स्वत:च्याच मुलाचा पाय तोडून त्याचं भविष्य उध्वस्त केलं आहे.

VIDEO :