अखेर कुख्यात गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, उद्या किल्ला कोर्टात हजर करणार

पाच वर्षांपासून मुंबईतल्या विलेपार्लेत खंडणीसाठी रवी पुजारीनं एकाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात रवी पुजारीवर गुन्हाही दाखल झाला होता.

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 19:08 PM, 22 Feb 2021
अखेर कुख्यात गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, उद्या किल्ला कोर्टात हजर करणार
Ravi Pujari

मुंबईः कुख्यात गुंड असलेल्या रवी पुजारीला मुंबईत आणण्यात मुंबई पोलिसांनी यश मिळवलंय. बंगळुरू कोर्टाकडून त्याचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणलं असून, रवी पुजारीला उद्या किल्ला कोर्टात हजर केलं जाणार आहे. रवी पुजारी याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी अटक केलीय. पाच वर्षांपूर्वी मुंबईतल्या विलेपार्लेत खंडणीसाठी रवी पुजारीनं एकाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात रवी पुजारीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुंबईत रवी पुजारीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Goon Ravi Pujari In The Custody Of Mumbai Police And Will Appear In The Fort Court Tomorrow)

दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमधून अटक

अनेक वर्षांपासून फरार असलेला रवी पुजारीसा गेल्यावर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. दक्षिण आफ्रिकेबरोबर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता त्याला कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले आहेत.

रवी पुजारीच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर झाडल्या होत्या गोळ्या

2016 मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने 8 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मुख्य फरार असलेला आरोपी रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. शनिवारी त्याला मंजुरी मिळाली असून, रवी पुजारीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेय.

रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे येथील रहिवासी

रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे (जि. उडपी) येथील असून, 1990 पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत असलेल्या पुजारीने नंतर स्वतःची टोळी बनविली. मुंबईसह बंगळुरू, मंगळूर येथील विविध व्यावसायिकावर, बॉलिवूड, बिल्डर यांच्याकडे खंडणी गोळा करू लागला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे. परदेशात पलायन केल्यानंतर सहकाऱ्यांमार्फत त्याने हे काम सुरू ठेवले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजाविण्यात आली होती.

संबंधित बातम्या

गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं, कर्नाटक पोलिसांना मोठं यश

Goon Ravi Pujari in the custody of Mumbai Police and will appear in the Fort Court tomorrow