गोड्डा : कोळसा उतरविल्यानंतर पोलिसांच्या भीतीने भरधाव वेगात धावणाऱ्या जुगाड वाहनाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात घुसल्याने आजी नातीचा जागीच मृत्यू झाला. शिवाय दोन गुरेही दगावली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नर्गिस खातून आणि फारिया खातून अशी अपघातात मृत्यू झालेल्या आजी-नातीची नावे आहेत. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.