आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत कोठडी

एनसीबीच्या मुंबई झोनचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठा ड्रग्स साठा सापडला.

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:33 PM, 25 Feb 2021
आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत कोठडी

मुंबईः एनसीबीच्या मुंबई युनिटने दिल्लीत कारवाई करून एका ड्रग्स व्यापाऱ्याला अटक केलीय. मोहमद अनस असं त्याचं नाव आहे. मुंबईत आणून आज त्याला कोर्टात हजर केलं असता दोन मार्चपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आलीय. अनस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे.
एनसीबीच्या मुंबई झोनचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठा ड्रग्स साठा सापडला. (International drug mafia handcuffed from Delhi; Detention from court until March 2)

छाप्यात 2613 ट्रेमोडोल या ड्रग्सच्या टॅबलेट सापडल्या

एनसीबीने कुर्ला येथे एका कुरियर कंपनीत धाड टाकली होती. त्या ठिकाणी अनेक पॅकिंग वस्तू होत्या. त्यातल्या काही उघडल्या असता त्यात 2613 ट्रेमोडोल या ड्रग्सच्या टॅबलेट सापडल्या. त्या कारवाईत तपास केला असता त्याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचं उघड झालं. त्यानंतर एनसीबीच्या टीमने दिल्ली येथे जाऊन कारवाई केली.

ड्रग्स कुरिअरच्या माध्यमातून परदेशात पाठवलं जात होतं

दिल्लीत पुन्हा 2835 ट्रेमोडोलच्या टॅब्लेट सापडल्या. त्याचप्रमाणे 100 एम्पालीज इंजेक्शन आणि सुमारे सात किलो कोडिएन औषध सापडलं. हे सर्व ड्रग्स कुरिअरच्या माध्यमातून परदेशात पाठवलं जाणार होतं.

अनस हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया

मास्टरमाईंड मोहमद अनस हा होता. अनस हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया आहे. बंदी असलेली आणि ज्याचा वापर ड्रग्स म्हणून होत असतो, अशी औषध तो परदेशी पाठवत होता. तो प्रामुख्याने हे ड्रग्स चीन, कझाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश आदी देशात पाठवत असल्याचं उघड झालं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्स माफियाचा गोळीबारात मृत्यू

तर गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाब सीमेतून भारतात ड्रग्स पाठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रग्स माफियाचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यावेळी मोठया प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं. त्याच प्रमाणे समुद्रातही मोठी कारवाई करून ड्रग्स जप्त केलं होतं. त्यामुळे आता ड्रग्स माफिया नव्या मार्गाच्या शोधात होते.

स्वतः पुढे न येता आता निराधार महिलांचा वापर करत होता

एनसीबीच्या कारवाईत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे ड्रग्स माफिया स्वतः पुढे न येता आता निराधार महिलांचा वापर करत होता. एनसीबीने अटक केलेली दक्षिण आफ्रिकन महिला खनियांसिले प्रॉमिसे ही देखील निराधार होती. तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा सात वर्षाचा, तर एक चार वर्षाचा आहे. ती एकल पालक आहे. त्यामुळे तिला पैशाची गरज होती.

ड्रग्स माफियांकडून ड्रग्स कॅरियर म्हणून वापर

महिलेची पैशांची गरज ओळखून ड्रग्स माफियांनी तिचा वापर ड्रग्स कॅरियर म्हणून केला होता. तिच्याकडे ड्रग्सची बॅग दिली आणि तिला भारतात पाठवलं. तिला कोणाला भेटायचं आहे, कोणाला ड्रग्स द्यायचं आहे हे काहीच माहिती नव्हतं. मात्र, ती आता पकडली गेल्यावर तिला कुणीही फोन केलेला नाही. यापूर्वीच्या कारवाईत अशाच प्रकारे एकल पालक असलेल्या महिला, गंभीर आजारी असलेल्या महिला यांचा वापर ड्रग्सच्या तस्करीसाठी केला जात असल्याचं उघडकीस आलं होतं.

हेही वाचा :

एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

International drug mafia handcuffed from Delhi; Detention from court until March 2