बॅगेत सोन्याचं घबाड सापडलं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या DRI अधिकाऱ्यांच्या ताब्यात

आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोनं सापडलं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:38 PM, 12 Nov 2020
बॅगेत सोन्याचं घबाड सापडलं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या DRI अधिकाऱ्यांच्या ताब्यात

मुंबईः क्रिकेटपटू कृणाल पांड्याला DRIच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडल्यानंतर डीआरआयनं त्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावर जास्त सोनं आणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोनं सापडलं. त्यामुळेच डीआरआयनं त्याला ताब्यात घेतले आहे. (Krunal Pandya Detained At Mumbai Airport)

2016 च्या आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. कृणालने आतापर्यंत 55 सामने खेळले आहेत आणि 891 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत 40 विकेट्सही घेतल्या आहेत. कोरोनामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा जेतेपद मिळवले आहे. कृणाल पांड्यादेखील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल जिंकून कृणाल पांड्या गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी कृणाल पांड्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडलं. त्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

कृणाल पांड्या हा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. तो हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे. हार्दिक टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला आहे. त्याचवेळी कृणाल आयपीएल संपल्यानंतर भारतात परतत होता. कृणाल हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज आहे. तो भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळला आहे. तो टीम इंडियाकडून 18 T-20 सामने खेळला आहे. 14 विकेट्स मिळवण्याबरोबरच त्यानं 121 धावा केल्या आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

संबंधित बातम्या

हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर

IPL FINAL 2020, MI vs DC : अंतिम सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सला महत्वाचा सल्ला