अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारला, डॉक्टरला दृष्टीत अडथळे

हल्ल्यात डॉक्टर स्वप्नदीप थळे जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या डोळ्याला जखम झाल्याने त्यांना दिसत नाही. मारहाण करणारा रुग्ण हा अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील रहिवासी आहे.

अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारला, डॉक्टरला दृष्टीत अडथळे
डॉ. स्वप्नदीप थळे

रायगड : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे डॉ. स्वप्नदीप थळे यांच्या डोक्यात रुग्णाने पाठीमागून सलाईन स्टँड घातला. यामध्ये डॉ. थळे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हल्ल्यात डॉक्टर स्वप्नदीप थळे जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या डोळ्याला जखम झाल्याने त्यांना दिसत नाही. मारहाण करणारा रुग्ण हा अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने तो जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीआयू कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होता. डॉक्टर स्वप्नदीप थळे मंगळवारी रात्रपाळीसाठी ड्युटीवर आले होते. रात्री तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कोव्हिड सेंटरमध्ये आपले काम करत बसले होते. त्यावेळी रुग्ण पाठीमागून सलाईन लावण्याचे स्टँड हातात घेऊन आला आणि त्याने डॉक्टर स्वप्नदीप यांच्या डोक्यात स्टँड घातला.

एका डोळ्याने दिसणे बंद

मारहाणीत स्वप्नदीप हे रक्तबंबाळ झाले. त्यांच्या डोळ्याला जखम झाली असून त्याने एका डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. डॉक्टर स्वप्नदीप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई केली.

डॉक्टर मारहाणीच्या घटनेची पुनरावृत्ती

दीड दोन महिन्यांपूर्वी डॉ विक्रमजीत पडोळे, डॉ राजीव तांबळे या डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली होती. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा रुग्णाकडून मारहाण झाल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या :

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च

VIDEO: काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डॉक्टरवर हल्ला, मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

(Raigad Alibaug Hospital Corona Patient attacks Doctor with Saline Stand Dr Swapnadeep Thale loses eyesight)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI