रेखा जरे हत्येप्रकरणी बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज

बाळ बोठे याचा शोध लागला नसल्याने त्याला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आलाय.

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 20:05 PM, 1 Mar 2021
रेखा जरे हत्येप्रकरणी बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज
Rekha Jare Murder Case

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय. तर या अर्जावर लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिलीय. बाळ बोठे याचा शोध लागला नसल्याने त्याला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आलाय. (Rekha Jare Murder Case Application To The Court To Declare Bal Bothe Absconding)

पाच आरोपींविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर

तर या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेय. मात्र मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार घोषित करावे, यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय, त्याची सुनावणी लवकरच होणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालंय. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले आहे. त्याविरोधात बोठे याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला.

तपास कसा झाला?

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलंय. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिलीय. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बाळ बोठे हा पसार झालेला आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यात आणि राज्यातही शोध घेतल्यानंतर बाळ बोठे पोलिसांना आढळून आलेला नाही. जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय.

आधी न्यायालयात काय घडलं होतं?

बाळ बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बाळ बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टँडिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत 2 वेळेस न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला होता.

संबंधित बातम्या

Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा, कोर्टाने अर्ज फेटाळला

Rekha Jare Murder Case Application To The Court To Declare Bal Bothe Absconding