चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नी आणि मेहुण्याचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीसह मेहुण्याचा खून केला आहे. ही घटना लातूरमधील भातांगळी गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे.

, चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नी आणि मेहुण्याचा खून

लातूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीसह मेहुण्याचा खून केला आहे. ही घटना लातूरमधील भातांगळी गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे. सासरवाडीत जाऊन या क्रूर जावयाने आपल्या पत्नीची आणि मेहुण्याची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. सुवर्ण भोपळे आणि युवराज निरुडे अशी मृत झालेल्या बहिण-भावांची नावं आहेत. आरोपी विकास भोपळे याला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत.

लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी येथील सुवर्णाचा विवाह थेरगाव येथील विकास भोपळे याच्याशी झाला होता. त्यांना आता दोन मुलंही आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुवर्णाचा पती विकास हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. या सततच्या मारहाणीला कंटाळून सुवर्णा चार दिवसांपूर्वी माहेरी निघून आली होती. माहेरी घरी सुवर्णा झोपलेली असताना मध्यरात्री विकास हातात तीक्ष्ण हत्यार घेऊन आला आणि त्याने तिच्यावर सपासप वार केले. आपल्या बहिणीला तिचा नवरा मारतोय हे पाहून सुवर्णाचा भाऊ युवराज निरुडे हा मध्ये पडला. मात्र डोक्यात संशयाचं भूत शिरलेल्या विकासने युवराजवरही चाकूने वार केले. दोघाही बहीण-भावंडांचा या घटनेत दुर्दैवी  मृत्यू झाला. या घटनेने लातूरच्या ग्रामीण भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पत्नी आणि मेहुण्याची हत्या केल्यानंतर विकास भोपळेने स्वतः पोलिसात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने आता सुवर्णाची दोन चिमुकली मुले आईच्या ममतेला पोरकी झाली आहेत, तर वडील क्रूरकर्म करून तुरुंगात गेला आहे. दुसरीकडे निष्पाप युवराजचा बहिणीचे संरक्षण करताना मृत्यू झाला आहे. संशयाचं भूत माणसांचं जीवन कसं उध्वस्त करते  हेच या घटनेने पुन्हा एकदा समोर आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *