दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपीला मित्रांसह वडिलांचीही साथ

खूप शिकून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर (SSC Student) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये (Beed) 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण (Kidnapping of Student) केलं.

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 18:20 PM, 8 Sep 2019

बीड: खूप शिकून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर (SSC Student) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये (Beed) 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण (Kidnapping of Student) केलं. तिला नेकनूर येथे नेवून वासनांध आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मुलींच्या सुरक्षेचा (Girls Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडित मुलीने आकांताने विनवणी करत होती, मात्र त्यावेळी आरोपी तिच्या शरिराचे लचके तोडत होता. त्याला या कृत्यात त्याच्या मित्रांनी मदत केली. मागील वर्षभरापासून आरोपी पीडित मुलीची छेड काढत होता. 2 दिवसांपूर्वी ती खासगी शिकवणी वर्गावरून घरी जात असताना आरोपीने त्याच्या मित्रांच्या मदतीने तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला नेकनूर परिसरात एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

विशेष म्हणजे अल्पवयीन पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर आरोपीचे वडील घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी पीडित मुलीलाच बीड शहरातील एका शेडमध्ये डांबून ठेवलं. जेव्हा प्रकरण अंगलट आलं, तेव्हा आरोपीच्या वडिलांनी मुलीला परत पोलीस ठाण्यात हजर केले.

पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न

या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच यासंबंधी तक्रार दिल्यास मुलीची बदनामी होईल, असं पीडित मुलीच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यांच न ऐकता थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर पीडितेला शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथेही तिची हेळसांडच झाली.

या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रार आल्यानंतर तक्रार नोंदवून तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळणं अपेक्षित होतं. मात्र, पोलिसांनी हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपी पोलीस शिपाई गरजेला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोपींनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेचे नातेवाईकांनी केली आहे.

पीडितेवर अत्याचार होताना पालकमंत्र्याचं महिला सक्षमीकरणावर भाषण

पीडितेवर अत्याचार झाला, त्यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे महिला सक्षमीकरणावर बोलत होत्या. त्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये होत्या. याच काळात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे या प्रकरणात लक्ष घालणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.