स्वतःच्याच घरात चोरी, भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला, घरमालक अटकेत!

वर्ध्यात भाडेकरुच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या घरमालकाला अटक करण्यात आली आहे. भाडेकरु बाहेर गेल्याची संधी साधून घरमालकाने महिलेचं मंगळसूत्र लंपास केलं होतं.

स्वतःच्याच घरात चोरी, भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला, घरमालक अटकेत!

वर्धा : स्वतःच्याच घरात चोरी करणारा चोर तुम्ही कधी पाहिला आहे का? वर्ध्यात आपल्याच घरात राहणाऱ्या भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या घरमालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घरमालक राकेश नाल्लावार याने प्रियंका जिवतोडेच्या मंगळसूत्रासह काही दागिने चोरले होते.

हिंगणघाट शहरातील न्यू यशवंतनगर भागात भाड्याने राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरी झाली. शहरात सततच्या घरफोडीच्या घटना पाहता सुरुवातीला चोरांच्या टोळीवर संशय होता. मात्र सखोल चौकशी केली असता हा घरमालकाचा प्रताप असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. दारुच्या व्यसनातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात हिंगणघाट शहरात तीन दिवसात पाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. हिंगणघाट पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करुन पाचही चोऱ्या उघडकीस आणल्या. यातील चार चोरांना नागपूरमध्ये जेरबंद करण्यात आलं. याच दरम्यान यशवंतनगर मधील घरातील चोरीची कबुली न मिळाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिशेने तपास सुरु केला.

मूळ वडनेरमधील असलेल्या प्रियंका जिवतोडे या हिंगणघाटमध्ये राकेश नल्लावार यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. तीन ऑगस्ट रोजी प्रियंका आपल्या घरी कुलूप लावून वडनेरला गेल्या होत्या. वडनेरहून परत आल्यावर सात तारखेला ही चोरीची घटना उघड झाली.

प्रियंका यांचे चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या तोड्या असे 16 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं. यात संशयावरुन चार दिवसांपासून बाहेर गेलेल्या घरमालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं.

घरमालकाच्या वर्तनावरुन पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी मधील सोनार विनोद खेरा यांना विकल्याची कबुली दिली. यानुसार चोरीतील 16 हजारांचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला. चोरीचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *