धुळे आकाशवाणी केंद्रात अधिकाऱ्याकडून निवेदिकेची छेड

धुळे आकाशवाणी केंद्रात अधिकाऱ्याकडून निवेदिकेची छेड

धुळे : धुळे आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकाऱ्याने एका निवेदिकेची दारुच्या नशेत छेड काढल्याचा आरोप आहे.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी केंद्रात जाऊन अधिकाऱ्याला चोप दिला. शिवाय अधिकाऱ्याला पीडित मुलीची माफी मागायला लावली. दरम्यान या अधिकाऱ्याने आपण हे कृत्य केल्याची कबुलीही दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

धुळे आकाशवाणी केंद्रात नागपूर येथून बदली होऊन हा कार्यक्रम अधिकारी आला आहे. हा अधिकारी संध्याकाळी मद्य प्राशन करुन आकाशवाणी केंद्रात आल्याचं सांगण्यात येत आहे. याठिकाणी कामानिमित्त आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला संबंधित अधिकाऱ्याने दिल्ली आकाशवाणी केंद्रावरुन आलेला आर एन चा मेल तपासण्याचं निमित्त करुन, आपल्या दालनात बोलवले. याठिकाणी गेल्यावर या अधिकाऱ्याने तरुणीचा हात पकडून छेड काढल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. याप्रकरणी तिचे पालक देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र पोलीस निरीक्षकाने मुलीचीदेखील बदनामी होईल असे सांगून सदर घडलेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. बदनामीच्या भीतीने मुलीच्या पालकांनी देखील गुन्हा दाखल केला नाही.

मात्र या प्रकाराबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धुळे आकाशवाणी केंद्र गाठले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता, त्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

यावेळी अधिकाऱ्याला मुलीची माफी मागण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे धुळे आकाशवाणी केंद्र चर्चेत आले असून अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *