नाराज बायकोला घरी आणण्यासाठी नवरा झाला ‘राज्यमंत्री’

ठाणे : कल्याणमध्ये एका व्यक्तीने नाराज बायकोला घरी आणण्यासाठी थेट राज्यमंत्री असल्याची बतावणी केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावत पोलिसांवर दबाव टाकला. माझ्या कार्यकर्त्याची बायको घरी आणण्यासाठी काही तरी करा, असा आदेशच त्याने पोलिसांना दिला. मात्र, या तोतया राज्यमंत्र्याच्या फोनचा मागोवा काढल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नितीन जाधव असे आरोपीचे नाव आहे. नितीन …

State Minister, नाराज बायकोला घरी आणण्यासाठी नवरा झाला ‘राज्यमंत्री’

ठाणे : कल्याणमध्ये एका व्यक्तीने नाराज बायकोला घरी आणण्यासाठी थेट राज्यमंत्री असल्याची बतावणी केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावत पोलिसांवर दबाव टाकला. माझ्या कार्यकर्त्याची बायको घरी आणण्यासाठी काही तरी करा, असा आदेशच त्याने पोलिसांना दिला. मात्र, या तोतया राज्यमंत्र्याच्या फोनचा मागोवा काढल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नितीन जाधव असे आरोपीचे नाव आहे.

नितीन जाधव कल्याण तालुक्यातील वाहुली परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी नितीनचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाले. त्यामुळे पत्नी घर सोडून गेली. नितीन जाधवने पत्नीला घरी आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र, पत्नी घरी यायला तयार झाली नाही. अखेर नितीनने शक्कल लढवत त्याने एक दिवस टिटवाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना फोन केला. त्याने फोनवर बोलताना आपण राज्यमंत्री दिलीप कांबळे बोलतो आहे. तसेच नितीन जाधव हा माझा कार्यकर्ता असून त्याचे पत्नीसोबत वाद झाले आहेत. काहीही करुन त्याची पत्नी घरी आली पाहिजे. काही तरी करा, असे सांगितले. हे ऐकून पोलीस निरीक्षक पांढरे हैराण झाले.

काही वेळानंतर नितीन जाधव टिटवाळा पोलीस स्थानकात आला. त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांना भेटून राज्यमंत्री दिलीप कांबळेंची ओळख सांगितली. तसेच त्यांनी तुम्हाला फोन केला होता, असे सांगितले. यावेळी नितीनच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात ज्या मोबाईल क्रमांकावरुन कॉल करण्यात आला, तो नंबर नितीन जाधवच्या नावावर असल्याचे उघड झाले. त्यामुळे अखेर नितीनचे बिंग फुटले आणि टिटवाळा पोलिसांनी त्याला अटक केली. नितीन जाधवने बायकोला घरी आणण्यासाठी केलेले राज्यमंत्र्याचे नाटक आणि त्यानंतर त्याची अटक हा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *