सांगलीत भाजप कार्यकर्त्याला भर रस्त्यात भोसकले

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुभाष बुवा यांची हत्या झाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

  • Tv9Marathi Team
  • Published On - 8:30 AM, 9 Jun 2019

सांगली : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुभाष बुवा यांची हत्या झाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. सागंलीच्या संजय नगरजवळील सूर्यनगर कॉलनी परिसरात हा हत्येचा थरार पाहायला मिळाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

शनिवारी (8 जून) काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ ठोकला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सुभाष बुवा यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी सुभाष यांना मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी सुभाष बुवा यांच्या चार चाकी गाडीच्या काही जणांनी काचा फोडल्या असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे ही हत्या पूर्ववैमन्यस्यातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.