मन्या सुर्वे बनण्याचं स्वप्न महागात, वैभव सुर्वे तुरुंगात!

मन्या सुर्वे बनण्याचं स्वप्न महागात, वैभव सुर्वे तुरुंगात!

मुंबई: मन्या सुर्वे बनण्याचं स्वप्न एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. मन्या सुर्वेचं नाव वापरुन दहशत पसरवणाऱ्या वैभव सुर्वे नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव सुर्वेने फक्त दहशत पसरवण्यासाठी एका पादचाऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे के.जे.पुट्टेगौडा नावाचे गृहस्थ कायमचे अपंग झाले आहेत.

वैभव सुर्वेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वे बनायचं होतं. म्हणून तो वडाळा परिसरात दहशत माजवणे, लोकांना धमकावणे, हफ्ता वसूल करणे या सर्व मार्गांचा अवलंबन करत, बेकायदा कृत्ये करत होता.

के. जे पुट्टेगौडा वडाळ्याच्या जुन्या बीपीटी कॉलनीत मित्रासोबत बसलेले होते. अचानक हा वैभव सुर्वे तिथे आला आणि सगळ्यांना धमकावू लागला. पुट्टेगौडा यांनी त्याला जाब विचारला असता,  “आता परत आला मन्या सुर्वे, सर्वांची वाट लाऊन टाकतो” असं म्हणत त्याने पुट्टेगौडा यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. वैभव सुर्वेने केलेले वार इतके गंभीर होते की आज त्यांचा डावा हात निकामी झाला आहे, तर उजव्या हाताचा अंगठा त्यांना कायमचा गमवावा लागला.

हल्ल्यानंतर पुट्टे गौडा हे केईम रूग्णालयात दाखल झाले. मात्र तिथे त्यांना धमकवण्यात आलं आणि तक्रार केलीस तर याद राख असं बजावण्यात आलं. भीतीपोटी गौडा यांनी तक्रार केली नाही. मात्र काही दिवसांनी धाडस करून त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी वैभव सुर्वेच्या मुसक्या आवळल्या. मुळात गुंड असलेल्या वैभवला त्यापेक्षा मोठा गुंड अर्थात मन्या सुर्वे बनायचं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *