नवऱ्यावर कुऱ्हाडीने वार करुन बायकोची नदीत उडी

पतीवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. चारित्र्याच्या संशयावरुन हा थरार घडला.

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 11:33 AM, 6 Jun 2019

चंद्रपूर : पतीवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. चारित्र्याच्या संशयावरुन हा थरार घडला. या हल्ल्यात पती जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या घुग्गुस इथल्या नकोडा भागात पहाटे ही घटना घडली. पती-पत्नीत पहाटे पहाटेच जोरदार वाद झाला. या वादातून पत्नीने पती बबन सोयामवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पती किरकोळ जखमी झाला. या वादादरम्यान आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. पती बबन सोयाम याला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या हल्ल्यानंतर पत्नी अर्चना सोयाम हिने वर्धा नदीकडे धाव घेत स्वतः नदीत उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी वर्धा नदी किनारा गाठून पत्नीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. चारित्र्यावर संशय घेतल्याने एक कुटुंब उध्वस्त झाले आहे. घुग्गुस पोलीस याबाबत अधिक तपास  करत आहेत.