अक्षय कुमारचा दिलदारपणा, ‘फनी’ वादळ पीडितांना एक कोटीची मदत

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:37 AM, 7 May 2019
अक्षय कुमारचा दिलदारपणा, 'फनी' वादळ पीडितांना एक कोटीची मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या भारतीय नागरिकत्वावरुन भलेही वाद असला, तरी त्याने त्याचं भारताबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा सिध्द केलं आहे. अक्षय कुमार हा पुन्हा एकदा अडचणीत असलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. अक्षय कुमारने ‘फनी’ चक्रीवादळ पीडितांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

ओदिशामध्ये ‘फनी’ चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. स्थानिक लोकांना त्यांचं घर सोडून स्थलांतरित व्हावं लागलं. ओदिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यापासून सावरण्यासाठी आता देशभरातून ओदिशाला मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ओदिशाला 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर आता अक्षय कुमारने ओदिशातील जनजीवन सुरुळीत व्हावं यासाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

नागरिकत्वावरुन वादात असलेल्या अक्षयने अशाप्रकारे गरजू लोकांना मदत करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अक्षय पीडितांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. तो फक्त एक रिल लाईफ हिरोच नाही, तर रिअल लाईफमध्येही हिरो आहे, हे सिद्ध करणारी अनेक कामे त्याने केली आहेत.

शहिदांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, त्यांच्या मुलाबाळांचं व्यवस्थित संगोपन व्हावं या उद्देशाने अक्षयने भारत सरकारच्या माध्यमातून ‘भारत के वीर’ हे अॅप आणि वेबसाईट सुरु केली. याच्या माध्यमातून एकाच वर्षात 29 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या 29 कोटी रुपयांमधून 159 शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली होती.

त्याशिवाय अक्षयने आत्महत्याग्रस्त कुटुंबानाही मदत केली होती. 2015 मध्ये बीडमध्ये भीषण दुष्काळ होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या होत्या. त्यावेळी अक्षयने आत्महत्याग्रस्त 30 कुटुंबांना तब्बल पंधरा लाख रुपयांची मदत केली होती. अक्षयने जलयुक्त शिवार, सॅनिटरी पॅड, पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांनाही मदत केली होती. तसेच, अक्षयने केरळ आणि चेन्नईच्या पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली होती.

अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन वाद

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडलं. यावेळी मुंबईतील मतदानासाठी अक्षय कुमार मतदान केंद्रावर मत देण्यासाठी पोहोचला नाही. त्यानंतर, अक्षयला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अक्षयच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर अखेर  अक्षयने मौन सोडत त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर जाहीर स्पष्टीकरण दिलं. “मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीही लपवलं नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने केलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल”, असं अक्षय कुमारने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

कॅनडातील टोरंटो हेच माझं घर, अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

अक्षय कुमारची पाच कामं, जी महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही

मी भारतात राहतो, भारतात कर भरतो, नागरिकत्वावरुन वाद का? अक्षय कुमार

VIDEO :