आदित्य पांचोलीची गॅरेज मालकाला जीवे मारण्याची धमकी

आदित्य पांचोलीची गॅरेज मालकाला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदित्य पांचोली याने एका गॅरेजमधून आपली गाडी दुरुस्त केली. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केली. शिवाय, गॅरेज मालकाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यामुळे गॅरेज मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठत अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गॅरेज मालकाचा आरोप आहे की, “आदित्य पांचोलीने माझ्याकडून गाडी दुरुस्त करुन घेतली. या कामाचे 2 लाख 82 हजार 158 रुपये झाले. कारचे काम सुरु करण्याआधीच मॅकेनिकने त्यांना किती खर्च होईल, याची माहिती दिली होती. ज्यावर आदित्य यांनी होकार दिला आणि गाडीच्या कामाला सुरुवात केली. मात्र जेव्हा गाडीचे काम पूर्ण झाले, तेव्हा आदित्यने पैसे देण्यास नकार दिला आणि जीवे मारुन टाकेन अशी धमकी दिली.”

या झालेल्या प्रकरणावर गॅरेज मालकाच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा आदित्य पांचोली वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गॅरेज मालकाच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.

कोण आहे आदित्य पांचोली?

आदित्य पांचोली बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आहेत. आदित्य पांचोली याने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्याच्या करिअरची सुरुवात 1986 साली झाली. कब तक चुप रहुंगी, कातील, साईलाब, लाल परी, चोर और चांद सारख्या चित्रपटातून अभिनेता आदित्य पांचोली घरा घरात पोहोचला. यासोबतच आदित्य पांचोली यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकरली आहे. बाजीराव मस्तानी, जय हो, रेस 2, बॉडीगार्डसारख्या चित्रपटातही पांचोलीने काम केलं आहे.

यापूर्वीही आदित्य पांचोली अनेक वादातून चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावतने ‘आपकी अदालत’ कार्यक्रमात आदित्य पांचोलीवर मानसिक आणि शाररीक त्रास देत असल्याचे सांगितले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *