मनसेच्या आघाडी प्रवेशाची चर्चा, 100 बातम्या एकाच ठिकाणी वाचा

मनसेच्या आघाडी प्रवेशाची चर्चा, 100 बातम्या एकाच ठिकाणी वाचा

मुंबई : मोबाईल चाळत असताना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बातम्या वाचता आणि जगाशी कनेक्ट राहता. पण टीव्ही 9 मराठी तुम्हाला एकाच ठिकाणी 100 बातम्या देत आहे. यासाठी कोणतीही सर्फिंग करायची गरज नाही किंवा जास्त वेळ घालवायचा नाही. एकाच ठिकाणी थोडक्यात सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचकांना वाचता येतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक संपन्न झाली. निवडणुकींबाबत राज यांनी गोपनीयता पाळली असून नेत्यांनीही मीडियासमोर काही बोलण्यास नकार दिला.

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यासोबत भेटीचं वृत्तही राज ठाकरेंनी फेटाळलंय. माझ्या घराच्या लग्नात व्यस्त असल्यामुळे त्यांना भेटणं शक्यच नाही, अशी माहिती राज यांनी टीव्ही 9 ला दिली.

महाआघाडीत मनसेला घेण्याच्या हालचालींना वेग आला असून मनसेला ईशान्य मुंबई मतदार संघाची एक जागा हवी आहे. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्याविरोधात मनसेला निवडणूक लढवायची असून मनसेकडून महेश मांजरेकर उमेदवार असण्याची शक्यता आहे.

राज यांना देखील आघाडीचा फायदाच होणार असून आम्हाला एका-एका मताची गरज असताना राज यांच्या मागे तर हजारो मतं आहेत, असंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू असून ते नक्की आघाडीत येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. यासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली असून त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ बोलत होते.

काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलाय.

नारायण राणे यांना महाआघाडीत घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असून आघाडीला अजूनही राणेंची आशा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून राणेंशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरु आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलनाला बसले असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र अण्णा फार तर फार तीन दिवस उपोषण करू शकतात असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. यावेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर वेशीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

10.

आम्ही अण्णा हजारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अण्णा चर्चेला तयार नसल्याची माहिती जससंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. अण्णांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना भेटणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

मेट्रो -3 प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचं नावं शिवसेनाभवन करावं, अशी मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. सिद्धीविनायक मंदिर आणि सीतलादेवीतून मेट्रो जात त्यांचं नाव मेट्रोला देण्यात येतं, मग शिवसेना भवनाचं नाव मेट्रोला का नाही, असा सवाल देसाई यांनी केला.

12.

कोल्हापूरमध्ये एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. आतापर्यंत कोल्हापूरच्या 12 साखर कारखान्यांना नोटीस पाठवून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

13.

साखरेचे दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देता येणार नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना 600 रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील कासारे गावात शेतकरी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार हिना गावित यांच्याविरोधात आंदोलन करत रस्त्यावर कांदा फेकलाय. या घटनेनंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम न दिल्यास जप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा संघटनेने दिलाय.

17.

शिवसेनेचं संतांना पूर्णपणे समर्थन असून उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर शिवसेना शिलान्यासासाठी अयोध्येत जाईल, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी दिली.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी निरव मोदी याच्या अलिबागच्या बंगल्यावर तोडक कारवाईला सुरूवात झाली. मात्र प्रशासनाची एकप्रकारे फजितीच झाली असून हा बंगला पाडताना शासनाच्या नाकीनऊ आल्याचं दिसतंय.

19.

या तोडक कारवाईला 25 जानेवारीपासूनच प्रत्यक्षरित्या सुरूवात झाली होती, मात्र अद्याप प्रशासनाला बंगल्याचा एक कोपराही तोडण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मदतीने बंगला पाडण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोसाठी कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालंय. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून हे दोन्ही टीबीएम्स बाहेर पडणं वैशिष्ट्यपूर्ण असंच आहे.

दादरच्या शिवसेना भवनापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आलं असून सध्या 17 टीबीएम्स मशीन मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत. आतापर्यंत 35 टक्के भुयारीकरण पूर्ण झालंय.

PUBG हा ऑनलाईन गेम बंद करा या मागणीसाठी वांद्रेच्या 11 वर्षीय मुलाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. या गेममुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याची तक्रार त्याने पत्रात केली.

अमरावती विभागातील नाशिक विद्यापीठाच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतीकारकांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. टीव्ही 9 ने बातमी प्रकाशित केल्यानंतर तातडीने ही चूक दुरूस्त करण्याची ताकीद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हाण इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीत चक्क साप शिजलाय. खिचडी खाण्यापूर्वी शिक्षकाने तपासणी केल्याने साप आढळून आला. त्यामुळे सुदैवाने ही खिचडी कोणी खाल्ली नाही.

खिचडीत चक्क साप शिजत असतानाही इतका मोठा निष्काळजीपणा झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय. तर शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतीकारी निर्णय असेल, असं सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केलंय. ते रत्नागिरीच्या केळशी इथे बोलत होते.

शेतकऱ्यांकडून शेण विकत घेऊन त्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलंय. हे खत शेतकऱ्यांना 50 टक्के सवलतीत दिलं जाणार आहे.

स्टेट बँकेच्या ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. टेकक्रंचने दिलेल्या अहवालानुसार, बँक सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरली होती. त्यामुळे ही माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान SBI Quick सेवा थेट ग्राहकांच्या मोबाईल फोनशी संलग्न असल्याने सर्व्हरमधून लीक झालेला डेटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीतीदेखील वर्तवण्यात येतेय.

30.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात वांद्रे पूर्वेत एका परप्रांतीय रिक्षाचालकाने विद्यार्थ्याकडून जास्त पैसे मागितले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात हजर केलं. अशी घटना पुन्हा घडल्यास मनसेशी संपर्क साधावा असंही पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय.

औरंगाबादच्या रघुवीरनगरमधील व्यापारी पारस छाजेड यांच्यासह त्यांच्या पत्नी शशिकला आणि नातू पार्थ यांच्यावर हल्ला झालाय. हल्ल्यानंतर आरोपी फरार असून जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गडचिरोलीच्या पोटेगाव मार्गावर माओवाद्यांनी दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर जाळलाय. माओवाद्यानी आज भारत बंदचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पोटेगाव मार्गावर रस्त्याचं काम सुरू असताना झाडे कापून वाहने जाळण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर वाढल्याने जुना बाजार परिसरातील कोयता विक्रेत्यांवरच पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांऐवजी कोयता विक्रेत्यांमध्येच पोलिसांची दहशत निर्माण झालीये.

गुन्ह्यांमधून पकडलेल्या आरोपींनी स्वतःच जुन्या बाजारातून कोयते विकत घेतल्याची कबुली दिल्याने कोयते विक्रेते अडचणीत आलेत. कमी पैशात मिळणाऱ्या कोयत्यांमुळे इथे कायम विक्रीला जोर असतो.

साताऱ्याच्या पसरणी घाटात ट्रक आणि बाईकच्या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झालाय. तर एक जण जखमी झाला. या घटनेनंतर काही काळासाठी वाई-महाबळेश्वर रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

पुण्याच्या नारायण गावात नाशिक-कोल्हापूर शिवशाही बसला गाडीचे चाक निखळल्याने अपघात झाला.. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

नागपूर जिल्ह्यातील टाकळघट गावाजवळ शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बसचा टायर अचानक फुटल्याने घर्षण होऊन ही आग लागली. यावेळी बसमध्ये 9 प्रवासी होते. मात्र, आग लागल्याचं कळताच प्रवासी तसेच वाहक आणि चालक बसमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

अंबरनाथच्या गोविंद पूल परिसरातील फार्मिंग सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली. या आगीत संरक्षित झाडांचं नुकसान झालं असून अज्ञाताचा शोध सुरू आहे.

परभणीच्या जिंतूरमध्ये बाईकवरून जाणाऱ्या मजुरांच्या गाडीचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झालाय तर एकजण गंभीर जखमी आहे. बैलगाडी समोर आल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जातंय.

मनमाडच्या नव्या रेल्वे फूट ओवर ब्रिजवर टवाळखोर तरूणांनी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अद्याप या पुलाचे उद्घाटन झाले नसून त्याआधीच टवाळखोर पुलावर आले कसे, तसंच हे टवाळखोर कोण आहेत याचा शोध सध्या पोलीस घेतायत.

41.

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आग लागून जवळजवळ एक तास उलटून गेला तरी आग आटोक्यात आली नव्हती.

जळगाववातील बालगंधर्व नाट्यगृहाजवळील मनसाई हॉस्पिटला आग लागली.  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येतेय. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

43.

हिंदू महासभेच्या पुजा पांडे विरोधात नागपूरच्या सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. नागपूर काँग्रेसच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अलिगडमध्ये गांधींच्या पुण्यतिथी वेळी पुजा पांडे यांनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

44.

महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या बॅनरवर गोळ्या झाडण्याचा प्रकार हिंदूत्ववादी संघटनेकडून करण्यात आला होता. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने अंबरनाथमध्ये केलाय. महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालून गांधींना अभिवादन केलंय. महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली.

अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि गाडीचा अपघात झालाय. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रिधोरा बस थांब्याजवळ हा अपघात झाला.

चंद्रपूर-शहरातील कार्मेल अकॅडमीमधील 9 वर्षीय मुलाचा बसच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाला. यशराज चांदेकर असं मृतक मुलाचं नाव आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे मागील चाकाखाली येऊन यशराजचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यता येतोय.

47.

लातूरमध्ये एसटीचा चालक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. एसटी सुसाट वेगाने धावत असताना चालक मोबाईलवर बोलतोय. लातूर-औसा रस्त्यावर बस चालकाचा मोबाईलवर बोलतानाचा व्हिडीओ प्रवाशांनी काढलाय.

48.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा- केरवाडी समुद्रात भला मोठा मासा मिळालाय. तब्बल 348 किलो वजनाचा हा मासा आहे.  12 फूट लांबी या माशाची आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा मासा कोळ्यांच्या जाळ्यात आलाय.

नागपूरकरांना आता मेट्रो सोबतच शहरातील इतर भागांना जोडण्यासाठी इ-सायकल सेवा सुरु करण्यात आली आहे. आता नागपुरात  इ स्कूटर सेवाही काही दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे नागपूरकरांचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुखकर होणार आहे.

50.

महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील  1000 गावे विकसीत करण्याचा निर्धार केलाय. या योजनेअंतर्गत यवमाळमधील आदिवासी तालुका अशी ओळख असेलल्या कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावाचा विकास करण्यात आलाय.

नाशिकमध्ये संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला त्र्यंबकेश्वरमधून सुरूवात झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरमध्ये माऊलींचा जयघोष करत वारकरी दाखल होतायत.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक महापुजा करत राज्यावरचं दुष्काळाचं सावट दूर व्हावं अशी प्रार्थना केली. या सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी देवस्थानने खास व्यवस्था केलीये.

निवृत्तीनाथ महाराजांचं तैलचित्र साकारावं अशी वारकरी आणि देवस्थानाची इच्छा होती. अखेर गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे यांनी निवृत्तीनाथ महाराजांचं तैलचित्र रेखाटलं. या तैलचित्राचं अनावरण गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं.

अमरावतीत महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त एक सूर एक तालच्या माध्यमातून 7 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र गायन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील 7 गीते सादर केली.

नंदुरबारमध्ये दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या वतीने नंदुरबारमध्ये दुष्काळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 13 ठराव मंजूर करण्यात आले.

सरकार दुष्काळी भागात कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला. यावेळी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांचे ठराव पारित करण्यात आलेत.

साताऱ्यातील औंध इथे यमाई देवीची यात्रा भरली असून या यात्रेत ट्रॅक्टरची स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर चालकांनी या स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेचा आनंद द्विगुणीत केला. सुमारे 45 ट्रॅक्टर या स्पर्धेत सहभागी झाले होते.

उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी स्वतःच्या गाडीसोबत फोटोसेशन केलं असून त्यांचे फोटो व्हायरल होतायत. एक लिमोझिन कार आहे, तर दुसरी गाडी 100 वर्षे जुनी व्हिंटेज कार आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा विवाह नुकताच पार पडला. अमित आणि मिताली दोघेही फिरायला जातानाचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसलेत.

पुण्यातील रिदम डान्स अकॅडमीच्यावतीने अंध, मूकबधीर, एचआयव्ही बाधित मुलांसाठी उरी – द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड परिसरातील सिटी प्राईड थिएटरमध्ये या स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते.

61.

जे बेलवर बाहेर फिरत आहेत, ते जेलमध्ये नक्की जाणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. गुजरात येथील सुरतमध्ये झालेल्या रॅलीत ते बोलत होते.

मला हिशोब विचारणारे राहुल गांधी जामिनावर आहेत. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, असंही मोदी म्हणाले. अगस्टा वेस्टलँड, नॅशनल हेरॉल्ड या केसेसमध्ये गांधी कुटुंबीयांचे हात काळे झाले आहेत. ते दोषी ठरतील आणि जेलमध्ये जातील, असं मोदी म्हणाले.

हिंदूंच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. ज्यांनी अल्पसंख्याकांविरोधात असहिष्णुतेचा हवाला देत राम मंदिर उभारणीस विरोध केला आहे. त्यांनी पाकिस्तानला गेले पाहिजे. तिथे कशाप्रकारची लोकशाही आहे, हे पाहावे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीतून न्या. एन व्ही रमण यांनी देखील माघार घेतली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. ए. के. सिक्री यांच्यापाठोपाठ माघार घेणारे रमण हे तिसरे न्यायाधीश आहेत.

उत्तर प्रदेशमधील स्मारक घोटाळ्याप्रकरणी मयावती यांच्या घरासह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे मायावती यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबाबत राफेलवरून केलेल्या विधानाचा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समाचार घेतला. काँग्रेस अध्यक्षांनी आजाराशी संघर्ष करत असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर खोटे बोलल्याचं अमित शाह म्हणाले. खोटे बोलून राहुल यांनी असंवेदनशीलतेचा परिचय करून दिल्याची टीका त्यांनी केलीय.

67.

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून करण्यात आला आहे. या कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. नोटाबंदीनंतर रोजगारात लक्षणीय घट झाल्याचं अहवालत म्हटलंय.

68.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली.  नोटाबंदीने काळ्या पैशांची समांतर व्यवस्था संपली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणामध्ये केलंय. यावेळी राष्ट्रपतींनी विकासकामांचा पाढाच वाचला.

दरम्यान 15 कोटींहून अधिक जणांना कर्जाचा लाभ मिळाला असून कौशल्य विकास योजनेत 1 कोटी तरूणांनाही प्रशिक्षण देण्यात आल्याचं कोविंद यांनी म्हटलंय.

दरम्यान सर्व पक्षीय खासदारांनी कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी आवाहनं केलं होतं. तसंच संसदेत चांगली चर्चा न झाल्याने देशातील जनता नाराज असल्याचंही मोदींनी म्हटलंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर मोदी संध्याकाळी मित्रपक्षांसोबत चर्चा करणार आहेत.

72.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी टीडीपीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोध प्रदर्शन केलं.

73.

योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधूंना धुम्रपान सोडण्याचं आवाहन केलं आहे. रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात असणाऱ्या अनेक साधूंकडून चिल्लम गोळा केली आणि आपण पुन्हा कधी तंबाखूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्यास सांगितलं.

अलिगडमध्ये गांधी जयंतीदिनी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारून प्रताप केलेल्या हिंदू महासभेच्या अलिगडमधील कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे.

अनंतनागच्या शैरबाग पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. दरम्यान दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्याने ग्रेनेड रस्त्यावर पडला. या घटनेत सीआरपीएफचे 2 जवान तसंच 3 नागरिक जखमी झालेत.

अगस्टा वेस्टलँड प्रकरणी ब्रिटीश दलाल ख्रिश्चियन मिशेलनंतर भारतीय यंत्रणांनी आणखी दोन दलालांना दुबईहून भारतात आणलं आहे. राजीव सक्सेना आणि दीपक तलवार अशी या दलालांची नावं आहेत.

राजस्थानमधील रामगड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. रामगडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साफिया जुबेर खान विजयी झाल्यात.

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू इथल्या मालना भागात सध्या बर्फवृष्टी झाली असून बर्फाची चादर पसरल्याचं चित्र दिसून येतंय.

रिलायंस जिओचा Jio phone 2 हा फीचर फोन आज पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या सेलमध्ये Jio phone 2 अवघ्या 2 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

80.

पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. हे सर्व विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी अश्रूधुरांचा मारा करून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.

81.

या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत. पाकिस्तानी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने हा लाठीचार्ज करण्यात आला.

82.

चीनमध्ये स्प्रिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून अनेक नागरिक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेत.. या फेस्टिव्हलमध्ये खान्यापिण्याची चंगळ दिसून येत असून इतरही अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात.

यजमानांना सलग तीन सामन्यात धूळ चारून मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडकडून अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतीय संघाला 8 गडी राखून विजय मिळवला आणि भारतावर नामुष्कीची वेळ ओढवली.

भारताचा डाव अवघ्या 92 धावांवर आटोपला आणि अवघ्या 15 षटकात न्यूझीलंडने सामना खिशात घातला. या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले.

भारताचा संपूर्ण संघ 92 धावांवर ऑलआऊट झाल्याने संघाची लाज गेली. खेळपट्टीवर आम्ही स्थिरावलो नाही, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

86.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने आजन्म बंदी ठोठावलेला भारतीय क्रिकेटपटू श्रीसंत याने पोलिसांच्या भीतीने आपण गुन्हा कबूल केल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने हा दावा केलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने श्रीसंतला चांगलचं झापलंय.

87.

पाचव्या आणि अखेरच्या वनडेत यजमान दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स आणि 10 ओव्हर्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवत एकदिवसीय मालिका 3-2 ने जिंकली. पाकिस्तानने दिलेलं 241 धावांचं माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने लीलया पेललं.

88.

चॅम्पियन्स लीगमधील अंतिम 16 जणांमधील मॅँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांना पॅरिस सेंट जर्मेनचा खेळाडू नेमारला खेळता येणार नाही. दुखापतीमुळे नेमारला किमान 10 आठवडे बाहेर राहावे लागणार आहे. नेमारवर शस्त्रक्रिया केली जाणार नाही.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांची शिष्या माँ आनंद शीला यांच्या जीवनावरील हा चित्रपट असून त्यात प्रियांका चोप्रा आनंद शीला यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सरोगसीद्वारे एकता कपूर आई झाली असून 27 जानेवारीला तिच्या मुलाचा जन्म झाला आणि त्यानंतर तिच्यावर बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव झाला.

हिंदी मालिकांच्या छोट्या पडद्यावर गेली 18 वर्षापासून अभिनय करणाऱ्या अभिनेत्याला मॉस्को विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. करणवीर बोहरा असं या अभिनेत्याचे नाव आहे.

मंगळवारी लॅक्मे फॅशन वीक 2019 यामी गौतमही सहभागी झाली होती. दरम्यान गाऊनमध्ये बूट अडकल्याने तिचा तोल गेला. मात्र ती पडता-पडता वाचली.

कंगना रणावतचा ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. सहाव्या दिवशी ‘मणिकर्णिका’ची कमाई घटली असून बुधवारी चित्रपटाने केवळ 4.50 कोटी रूपयांचा गल्ला जमवला.

मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या अध्यक्षपदी अभिनेत्री दीपिका पदूकोणची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती.

1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘83’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

96 .

कपिलचे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’आणि ‘द कपिल शर्मा शो’हे दोन्ही शो टीआरपीच्या यादी अव्वल होते. त्यामुळे कपिल कलाकारांना वाट पाहायला लावायचा. मात्र आता कपिल वेळेवर सेटवर येत असल्याची माहिती आहे.

97.

जात, धर्म, पैसा, संपत्ती प्रेमाच्या आड येत नाही. प्रेमाच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी प्रेम यशस्वी होतेच. अशीच एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ हा संगीतमय चित्रपट येत्या १५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुचिता जाचक यांच्या ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनल निर्मित ‘भेद’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते यांनी केले आहे.

  1. कॉफी विथ करण या शोमुळे हार्दिक पंड्या आणि केएल राहुल कसे अडचणीत आले ते सगळ्यांनीच पाहिलं. आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने एक वक्तव्य या कार्यक्रमात केलंय. करण जोहरने सिद्धार्थला प्रश्न विचारला की तुला सिनेमासृष्टीतील कुणाशी लग्न करायला आवडेल, तर त्याने करिना कपूरचं नाव घेतलं.

भारतीय संघाचा जो पराभव झालाय, त्यामुळे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर गेलाय. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत एकही सामना जिंकू शकत नाहीत का, असा सवाल भारतीय चाहत्यांनी केलाय.

100.

भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही खोड काढली. भारतीय संघ 100 धावांच्या आत बाद होऊ शकतो यावर विश्वास बसत नाही असं तो म्हणाला. पण या ट्वीटनंतर वॉनचा भारतीय चाहत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *