Bigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, ‘बिग बॉस’च्या घरातून कोण बाद?

नेहा आणि शिवानी यांच्या पाठोपाठ शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे-वीज आणि आरोह वेलणकर या आठवड्यात सुरक्षित झाले आहेत. मात्र त्यांचा प्रवेश महाअंतिम फेरीत झाला आहे, की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:45 PM, 25 Aug 2019
Bigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद?

Bigg Boss Marathi 2 मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील महाअंतिम फेरीसाठी (Bigg Boss Marathi 2 Grand Finale) अवघे आठ दिवस बाकी आहेत. नेहा शितोळे (Neha Shitole) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) यांनी ‘तिकीट टू फिनाले’ मिळवत महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यापाठोपाठ शिव ठाकरे (Shiv Thackeray), वीणा जगताप (Veena Jagtap), किशोरी शहाणे-वीज (Kishori Shahane Veej) आणि आरोह वेलणकर (Aroh Velankar) या आठवड्यात सुरक्षित झाले आहेत. मात्र त्यांचा प्रवेश महाअंतिम फेरीत झाला आहे, की पुढच्या आठवड्याच्या मध्यावधीला (Mid Week Elimination) पुन्हा एक एलिमिनेशन होणार, याबाबत साशंकता आहे.

बिग बॉसच्या ‘वीकेंडचा डाव’मधील रविवारी प्रसारित होणाऱ्या भागात कोणीही बाद झालं नसल्याचं महेश मांजरेकर यांनी अखेरीस जाहीर केलं. त्यामुळे सर्व स्पर्धकांचा जीव भांड्यात पडला. एलिमिनेशन प्रक्रियेसाठी गोल्डन बॉक्स आणण्यात आला होता. यामध्ये प्रत्येकाच्या नावाच्या पाट्या होत्या. सुरुवातीला शिव सेफ झाला. त्यानंतर आरोहला सुरक्षित घोषित करण्यात आलं. त्यामुळे वीणा किंवा किशोरी यापैकी एकीला घराचा निरोप घ्यावा लागणार, अशी सदस्यांची समजूत झाली.

महेश मांजरेकरांनी जेव्हा वीणाला सुरक्षित केलं, तेव्हा किशोरी बाद झाल्याचं सर्वांना वाटलं. परंतु किशोरीही सुरक्षित असून कोणाचंही एविक्शन होणार असल्याचं अखेरीस जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सर्वच स्पर्धक महाअंतिम फेरीमध्ये गेले आहेत, की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. याशिवाय अभिजीत बिचुकले या पाहुण्या स्पर्धकाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाद झालेले विद्याधर जोशी, मैथिली जावकर, दिगंबर नाईक, सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे, माधव देवचके, रुपाली भोसले, अभिजीत केळकर आणि हीना पांचाळ हे स्पर्धक पुन्हा घरात आले. त्यांनी दिलेल्या मतांच्या आधारे सर्वाधिक पसंती मिळवलेली नेहा (नऊपैकी आठ मतं) आणि शिवानी (नऊपैकी पाच मतं) यांना तिकीट टू फिनाले मिळालं. तर शिव, वीणा, आरोह आणि किशोरी नॉमिनेट झाले.

नॉमिनेट झालेल्या चौघांपैकी एकाला सुरक्षित करण्याची संधी बिग बॉसने दिली होती. मात्र किशोरी आणि वीणापैकी कोणाला तिकीट टू फिनाले द्यावं, याबाबत घरातील सदस्यांचं एकमत न झाल्यामुळे चौघंही नॉमिनेट राहिले. याशिवाय त्यांना बिग बॉसकडून बोलणीही खावी लागली. तसंच गेममधील आठ लाखांचं मूल्य घटल्यामुळे बिग बॉसच्या विजेत्याला मिळणार 25 लाखांची रक्कम कमी होऊन 17 लाखांवर आली. शिव आणि वीणा यांची लोकप्रियता पाहता किशोरी किंवा आरोह यांच्यापैकी एकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी अटकळ प्रेक्षक सोशल मीडियावर बांधत होते.

रविवारच्या भागात नेहा आणि शिव ‘लुंगी डान्स’ करताना दिसणार आहेत. तर किशोरी ‘निंबुडा’ गाण्यावर थिरकणार आहे. याशिवाय ‘फेसअॅप’ गेममध्ये घरातील सदस्यांपैकी कोणाला वीस वर्षांनी भेटायला तुम्हाला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिव-वीणा यांनी एकमेकांचं नाव घेतलं, तर नेहा आणि शिवानी यांनीही एकमेकींचीच निवड केली. बिचुकलेंनी त्यांच्या आवडत्या किशोरी ताईंचं नाव घेतलं, तर किशोरी यांनीही बिचुकलेंना भेटण्यास आवडेल असं सांगितलं. आरोहने स्वतःलाच भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पुढच्या रविवारी पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.