प्रकाश राज आणि कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भाजप खासदाराचा माफीनामा

मैसूरमधील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्याविषयी सोशल मीडियावर लेखन केले होते. त्याबद्दल दोन वर्षांनी सिम्हा यांनी खेद व्यक्त केला आहे

प्रकाश राज आणि कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भाजप खासदाराचा माफीनामा

बंगळुरु : प्रख्यात अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल भाजप खासदाराने माफी मागितली आहे. मैसूरमधील खासदार प्रताप सिम्हा (Pratap Simha) यांनी दोन वर्षांपूर्वी फेसबुक-ट्विटरवर लिहिलेली पोस्ट गुरुवारी डिलीट केली.

‘प्रिय प्रकाश राज, मी 2 आणि 3 ऑक्टोबर 2017 रोजी तुम्हाबद्दल आणि तुमच्या कुटुंबाविषयी आक्षेपार्ह लेख पोस्ट केला होता. हा लेख अन्यायकारक आणि आपलं मन दुखावणारा होता, हे माझ्या ध्यानात येत आहे. मी ही पोस्ट निःसंशयपणे मागे घेत आहे. फेसबुक आणि ट्विटरवरील त्या पोस्टविषयी मला खेद वाटतो.’ अशा आशयाचं ट्वीट सिम्हा यांनी केलं आहे.

 

विशेष म्हणजे, प्रकाश राज यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत प्रताप सिम्हा यांचा माफीनामा स्वीकार केला. ‘धन्यवाद प्रताप सिम्हा. मी तुमची माफी स्वीकारतो. आपल्या विचारधारांमध्ये फरक असेल, मात्र सोशल मीडियावर असभ्य भाषेत वैयक्तिक टिपणी नको करुयात. कारण आपण दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्यक्ती आहोत. आदर्श उदाहरणाचा दाखला देणं ही आपली जबाबदारी आहे.’ असं म्हणत प्रकाश राज यांनी या प्रकरणावर पडदा टाकला.

 

कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांचा मृत्यू साजरा करणाऱ्यांवर प्रकाश राज यांनी ताशेरे ओढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हत्येचा निषेध न केल्याबद्दल प्रकाश राज यांनी धिक्कार व्यक्त केला होता. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचं मोदींनी कौतुक केल्याचा दावाही त्यांनी केला होता.

2 ऑक्टोबर 2017 रोजी आयोजित एका कार्यक्रमात प्रकाश राज यांनी टीकास्त्र सोडलं होतं. मोदी हे आपल्यापेक्षाही मोठे अभिनेते असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. गौरी लंकेश या प्रकाश राज यांच्या निकटवर्तीय होत्या.

‘काहीच घडलं नसल्यासारखं वागणारे अभिनेते मी पाहतो, तेव्हा मला मिळालेले पाच राष्ट्रीय पुरस्कार मला त्यांना देऊन टाकावेसे वाटतात. ते माझ्यापेक्षा मोठे अभिनेते आहेत’ असं प्रकाश राज त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर सिम्हा यांनी प्रकाश राज यांच्यावर सोशल मीडियावरुन असभ्य भाषेत टीका केली. त्यावर प्रकाश राज यांनी त्यांच्याविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावाही ठोकला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *