Jack Ryan Season 2 REVIEW : जॅक रायन सीझन 2

जॅक रायनचा दुसरा सीझन (Jack ryan season two) हा भरपूर अॅक्शन सीन्स आणि लॅटीन अमेरिकन देशांमध्ये लोकशाहीच्या नावानं चालत असलेल्या खेळाबद्दल त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्वतःची एकाधिकारशाही मिळवू पाहणाऱ्या बड्या देशांमधल्या राजकारणाबद्दल आहे. त्यात अमेरिकेला खूप असभ्य आणि सोज्वळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी स्वतःच्या हितसंबंधांसाठी अमेरिका दुसऱ्या देशात कशी हस्तक्षेप करते हे या सीरीजमधून (Jack ryan season two) अप्रत्यक्षपणे का होईना समोर येतं.

Jack Ryan Season 2 REVIEW : जॅक रायन सीझन 2

मुंबई : भारताला सगळ्यात जास्त धोका कुणाकडून? चीनकडून की पाकिस्तानकडून, थेट धोका दोघांकडून कमी मात्र, अप्रत्यक्ष धोका हा भूतान, नेपाळ, बांगलादेश किंवा अगदी हिंदी महासागरातलं छोटं बेट दिएगोगार्सियाकडून आहे असं म्हटलं तर? फक्त लष्करी वापरासाठी नाही तर अन्य कुठल्या कारणांसाठी या ठिकाणांचा वापर होत नसेल कशावरुन? या छोट्या देशांमध्ये आणि शेजारच्या छोट्या बेटांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिथल्या प्रत्येक भल्या-बुऱ्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकार जे काही करत असेल नसेल ते सर्व फक्त भारताच्या जागी अमेरिकेला आणि त्यांच्या गुप्तहेर संस्थेला ठेवून पाहिलं तर जे समोर येईल ते म्हणजे जॅक रायन सीझन 2.

सीझन 2 ची सुरुवात होते ती एका मोठ्या जहाजावर ठेवलेल्या कंटनेर्सच्या फोटोंवरुन, हे जहाज चोरुन अमेरिकेच्या शेजारच्या व्हेनेझुएलामध्ये पोहोचलंय. जॅकला सॅटेलाईटच्या फोटोग्राफवरुन कळतं की त्या संशयास्पद जहाजावरच्या कंटेनर्सना अत्यंत सुरक्षित पद्धतीनं जंगलात लपवून ठेवण्यात आलंय. आणि तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या ताणलेल्या संबंधांमुळे त्या जहाजांमध्ये अमेरिकेविरुद्ध वापरण्यासाठी शस्त्रास्त्र असल्याचा संशय जॅकला येतो. तरीही प्रोटोकॉलनुसार ते आधी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला भेटून त्या जहाजात काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यात जॅकसोबत असलेल्या अमेरिकेच्या खासदारावर हल्ला होतो आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो.

या सगळ्या घटनांवरुन जॅकला खात्री पटते की त्या जहाजांवरच्या कंटनेर्समध्ये हत्यारचं आहेत. त्यासाठी त्या जंगलात जाऊन तो स्वतः खातरजमा करायचं ठरवतो. इकडे त्याचा जुना साथीदार ग्रीन हा हृदयरोगानं पीडित असल्यानं त्याला डेस्क जॉबला हलवण्यात येणार असतं पण तो व्हेनेझुएलामध्ये पोस्टिंग मागून घेतो. कारण तोही याच केसवर काम करत असतो. दोघे मिळून आपल्यापरीनं त्या जंगलात पोहोचून त्या कंटेनर्समध्ये नेमकं काय आहे ते पाहतात. त्या कंटेनर्समध्ये हत्यार नसून जमिनीत खोलवर खोदकाम करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि केमिकल्स असल्याचं त्यांना दिसून येतं. पण, ही यंत्र चोरुन का आणलेली असतात? व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली नेमकं काय सापडलेलं असतं, जे तिथल्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेपासून दडून ठेवायचं असतं? त्या खनिज सामुग्रीचा अमेरिकेला खरंच धोका असतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या सीरीजमध्ये हळूहळू मिळतात.

व्हेनेझुएलामधल्या निवडणुका, विरोधीपक्षांची गळचेपी या सगळ्या गोष्टी इतक्या ठळक करुन दाखवल्यात की त्या सगळ्यांमध्ये अमेरिका स्वतःच्या शेजारच्या देशांमधल्या प्रत्येक घडामोडींमध्ये बारीक लक्ष ठेवून असते आणि गरज असो किंवा नसो हस्तक्षेप करते याकडे प्रेक्षकांचं लक्ष जाऊ नये, मात्र, कितीही नाही म्हटलं तरी ते स्पष्टपणे दिसून येतं. अर्थात सीरीजमधून तसं स्पष्ट दाखवलं बोललं गेलं नसलं तरी अर्थ तोच निघतो.

सीरीजमध्ये अनेक पात्रं आहेत ज्यांचामुळे सीरीज लांबते. सीरीजमध्ये अधून मधून स्पॅनिश भाषा आल्यानं बरेचसे संदर्भ कळत नाहीत त्यासाठी सबटायटल्सकडे लक्ष ठेवावं लागतं.

जॅक रायनच्या पहिल्या सीरीजमध्ये जॅक हा काही जेम्स बॉण्ड नव्हे असं ठसवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सीक्वलमध्ये जॅकला जवळपास जेम्स बॉण्ड करुन टाकलाय. तुफान अॅक्शन सीन्स, एक बेड सीन, कुठेतरी वेबसीरीजचा जेम्स बॉण्ड अशी जॅकची इमेज बनवण्याचा प्रयत्न दिसतोय.

का पहावा?

गुप्तहेर आणि त्यांचं काम ही आपल्याकडे सध्या ट्रेंडमधली गोष्ट आहे. मिळालेल्या माहितीचं अॅनॅलिसीस कसं केलं जातं आणि त्यातून मूळ गोष्टीचा छडा कसा लावला जातो हे पहायला नक्की आवडेल.

गुप्तहेर खातं खरंच कसं काम करतं, त्यांचं कोणकोणत्या पातळ्यांवर कसं कसं काम चालतं हे पहायचं असेल तर जॅक रायन सीरीजचा सीझन 2 पहायला हवा.

का पाहू नये?

अमेरिका आणि कुठल्याशा व्हेनेझुएला या देशांमधला संघर्ष आपण का पहायचा यात भारताचा किंवा मुंबईचा किंवा इस्लामी दहशतवादाचा काही संबंध नाही असा विचार करणार असाल तर नक्कीच पाहू नका.

या सीरीजमध्ये कुठे टायगर जिंदा है सारखी ओव्हर द टॉप अॅक्शन सीन्स पहायची अपेक्षा करणार असाल तर अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता जास्त. अॅक्शन सीन्स आहेत पण ती टिपीकल हॉलिवुड स्टाईलची आहेत.

Published On - 12:20 pm, Sun, 1 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI