सावत्र वडिलांनी केलेल्या छळाविषयी टीव्ही अभिनेत्रीच्या मुलीची इन्स्टाग्राम पोस्ट

प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या मुलीने  इन्स्टाग्रामवरुन या घटनेतील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सावत्र वडिलांनी केलेल्या छळाविषयी टीव्ही अभिनेत्रीच्या मुलीची इन्स्टाग्राम पोस्ट

मुंबई : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या मुलीने  इन्स्टाग्रामवरुन या घटनेतील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला अश्लील फोटो दाखवून आरोपी अभिनव कोहली (Abhinav Kohli) ने छळ केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता.

‘माझ्याबद्दल काळजी वाटून पाठिंबा दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. दुसरं म्हणजे माझ्या वागणुकीबद्दल निर्माण झालेल्या काही शंकांचं निरसन मला करायचं आहे. मीडियाला या घटनेमागील सत्य माहित नाही, आणि त्यांना ते कधीच समजणार नाही. मी अनेक वेळा घरगुती हिंसाचाराला बळी पडले होते, माझी आई नाही. फक्त ज्या दिवशी तक्रार दाखल केली, त्या दिवशी अपवादाने माझ्या आईवर हात उचलला गेला’, असं अभिनेत्रीची मुलगी म्हणते.

‘बंद दाराआड काय चालतं, किंवा माझ्या आईने तिच्या दोन्ही संसारांमध्ये किती मनोधैर्य दाखवलं, याचा वाचकांना विसर पडू शकतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घरगुती प्रकरणांवर लिहित आहात. कोणाच्या तरी आयुष्यावर चर्चा करत आहात. सुदैवाने तुमच्यापैकी अनेकांना इतक्या घृणास्पद प्रकाराला कधी सामोरंही जावं लागलं नसेल. त्यामुळे तुम्हाला यावर भाष्य करण्याचा, पूर्वग्रहदूषित नजरेने एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा कोणताही अधिकार नाही.’ असं म्हणत तिच्या मुलीने हा विषय चघळणाऱ्यांना खडसावलं.

‘हे अत्यंत निंदनीय आहे. माझी आई माझ्या माहितीतील सर्वात कणखर व्यक्ती आहे, त्यामुळे तिला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. तिचा स्ट्रगल पाहणारी मी एकमेव व्यक्ती असल्यामुळे केवळ माझ्या मताला किंमत आहे’ असं ती पुढे म्हणते.

‘अभिनव गोहीलने मला कधीच शारीरिक त्रास दिला नाही, कधी चुकीचा स्पर्शही केला नाही. चुकीची गोष्ट पसरवण्याआधी किंवा त्यावर विश्वास ठेवण्याआधी वाचकांना सत्यता समजणं गरजेचं आहे. मात्र त्याने सतत अयोग्य आणि त्रासदायक टिपण्णी केलेली आहे, त्याचे परिणाम फक्त मला आणि आईलाच माहित आहेत. कुठल्याही महिलेने ते ऐकलं तर तिला लाज वाटेल आणि ती पेटूनही उठेल.’ अशा शब्दात तिने सावत्र वडिलांविषयी संताप व्यक्त केला.

‘ते शब्द कुठल्याही महिलेच्या मानसन्मानाला बाधा पोहचवणारे आहेत. ते कुठल्याही पुरुषाकडून ऐकणं अपेक्षित नाही, वडिलांकडून तर नाहीच नाही. सोशल मीडियातून आमच्या आयुष्यात डोकावणं, पेपरमध्ये आमच्याविषयी वाचणं यातून तुम्हाला आमचा स्ट्रगल समजेल, पण त्यावर कमेंट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ असंही अभिनेत्रीची मुलगी दरडावते.

‘माझी आई माझ्यासाठी सर्वात आदरणीय आहे. ती स्वयंसिद्ध आहे. तिला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. ती आमच्या दोन्ही कुटुंबांसाठी पुरुषाची भूमिका लीलया बजावत होती’ अशा भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत.

समतानगर पोलिसांनी 38 वर्षीय अभिनव कोहलीला काल (12 ऑगस्ट) अटक केली होती. अभिनव ऑक्टोबर 2017 पासून आपल्या मुलीला मॉडेलचे अश्लील फोटो दाखवतो. त्याचप्रमाणे तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो, असा दावा संबंधित अभिनेत्रीने केला होता. पीडिता ही अभिनेत्री आणि तिच्या पहिल्या पतीची मुलगी आहे, म्हणजेच आरोपी अभिनवची सावत्र मुलगी.

तक्रारदार अभिनेत्रीने अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नऊ वर्षांच्या संसारानंतर तिने 2007 मध्ये पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. 2013 मध्ये अभिनेत्री दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. नोव्हेंबर 2016 मध्ये तिला अभिनवपासून मुलगाही झाला. गेल्या वर्षभरापासून दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याविषयी दोघांनीही जाहीर बोलणं टाळलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *