जगण्या-मरण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ‘आनंद’चा सुवर्णमहोत्सव

मल्टीप्लेक्स सोडा, पण व्हिडीओ थिएटरही नसलेल्या काळात रिलीज झालेला 'आनंद' सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये बघायला लोकांच्या रांगा लागत होत्या...

  • गजानन कदम, कार्यकारी संपादक, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 6:40 AM, 14 Mar 2021
जगण्या-मरण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या 'आनंद'चा सुवर्णमहोत्सव

राजेश खन्ना आणि अमिताभ या दोन सुपरस्टारच्या सहजसुंदर अभिनयानं गाजलेल्या आनंदला प्रदर्शित होऊन आज 50 वर्षे झाली. म्हणजे आनंदचा आज 12 मार्च रोजी सुवर्णमहोत्सव आहे. मल्टीप्लेक्स सोडा, पण व्हिडीओ थिएटरही नसलेल्या काळात रिलीज झालेला ‘आनंद’ सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये बघायला लोकांच्या रांगा लागत होत्या…शोकांतिका अनेक गाजल्या. पण दोन-अडीच तास नुसता शोकांत असलेला आनंद लोकांच्या मनात घर करुन राहिला.

चित्रपटाचे पहिले दृश्य आहे डॉ. भास्कर बॅनर्जी अर्थात अमिताभला साहित्य पुरस्कार मिळत असल्याचे. डॉ. भास्कर बॅनर्जी भाषणातच आपल्या डायरीची आनंद कादंबरी कशी बनली ते सांगतात आणि चित्रपटाची कथा सुरु होते…दिल्लीतल्या त्रिवेदी नामक जुन्या दोस्ताची एक शिफारस चिठ्ठी येते कॅन्सरतज्ज्ञ असलेल्या डॉ भास्कर आणि डॉ. प्रकाश कुलकर्णी यांना येते. दुसऱ्याच दिवशी डॉ. प्रकाश यांच्या कन्सल्टिंगमध्येच आनंद अचानक येऊन टपकतो आणि चित्रपट संपेपर्यंत डॉ. भास्कर यांच्या आयुष्यात जागा पटकावतो. आनंद लिंफोसार्कोमा अर्थात आतड्याच्या कॅन्सरचा पेशंट आहे. पण पहिल्याच भेटीत तो बोलता बोलता या कॅन्सरची अशी खिल्ली उडवून टाकतो की गंभीर स्वभावाचा डॉ. भास्कर दंग होऊन जातो. कॅन्सर पेशंट म्हंटलं की हादरुन गेलेला या डॉ. भास्करच्या समजाला आनंद असा तडा देतो की शेवटपर्यंत आनंद आणि त्याचं व्यक्तिमत्व त्यांच्या अभ्यासाचा विषय होऊन जातो. आनंद सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ जगणार नाही हे आनंदला माहिती असतं हे कळल्यावर तर डॉ. भास्करना कसं रिऍक्ट व्हावं हेही कळत नाही. तो मृत्युवर हसतोय की जगण्यावर हेही त्यांना कळत नाही.

पहिल्याच भेटीत आनंद “जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए” असं म्हणतो. मला मृत्यु हा तर एका क्षणात येणार आहे, पण तो येण्यापर्यंतचे लाखो क्षण मला जगायला मिळणार आहेत त्यांचं काय ? असं बोलून जातो. मृत्युच्या भयाने जगणंच सोडून दिलं तर त्यासारखा दुसरा मृत्यु तो कोणता ? असा बिनतोड सवाल तो करतो. ओळखपाळख नसलेल्या आणि रोज अनेक मृत्यु पाहिलेल्या डॉ. भास्कर यांना पहिल्याच भेटीत आनंद हे मृत्युचं तत्वज्ञान पाजतो. मृत्युची अटळता तुम्हाआम्हा सर्वांना माहितीय, पण तरी सारे जण मृत्युचा विचार जेवढा बाजूला ठेवता येईल तेवढा ठेवतो. आनंदमधल्या संवादांनी लोकांना मृत्युचा विचार बाजूला न ठेवता विचारप्रवण बनवलं. आनंदमधले संवाद प्रेक्षकांना विचारांच्या खोल गर्भात घेऊन जातात. मृत्युची वृथा चिंता न करता जगण्याचे गाणे करावे हा त्यामागचा मेसेज.

कॅन्सरच्या पेशंटला तो किती जगणार हे सांगितलं जात नाही, पण आनंदला ते सांगितलेलं दाखवलंय. आपलं आयुष्य फार उरलं नाही हे माहित असतानाही उरलेलं आयुष्य आनंदानं जगण्यासाठी प्रचंड कणखरता लागते, वेडेपणाच असावा लागतो त्यासाठी. आनंदच्या भूमिकेत ही कणखरता आणि वेडेपणा आहे. कणखरता झाकून ठेवलाय आणि वेडेपणा चेहऱ्यावर दाखवून हृषीकेश मुखर्जींनी हे जबरदस्त पात्र उभं केलंय. शरीर कमजोर होत गेलं तरी हसतमुख राहणाऱ्याची मनःशक्ती सुदृढ राहते, कायम राहते असं डॉ. भास्कर एकदा डायरीत लिहतोही.

आनंद कुठून आला, कसा आला, त्याचे कोणच कसे नातेवाईक नाहीत असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत राहतो. इंटरवल होईपर्यंत त्याची उत्तरं मिळत नाहीत. पण डॉ. प्रकाश ही उत्तरं सांगतात. आनंद 1947 च्या फाळणीदरम्यान लहान असतानाच अनाथ झाला, ज्या कुटुंबाने वाढवले त्यांना तो जड होत असल्याचं दिसतात, त्यांचीही साथ सोडून एकटाच जगायला लागला, ही माहितीही आनंदनंच डॉ. प्रकाश यांची पत्नी सुमनला सांगितलेली असती.

आनंद जाणार म्हणून डॉ. भास्कर आतून उद्ध्वस्त झालाय. एकांतात बसून विचार करत राहावे वाटते. पण बोलका आनंद येऊन शांतता भंग करतो. स्वभावपरत्वे डॉ. भास्कर कधी नव्हे ते भडकतात. पण हे भडकणे आनंदवर नाही तर स्वतःवर आहे. मी काहीच करु शकत नाही, हातातून वाळू निसटावी तशी आनंद सोडून जाणार म्हणून आलेला हा स्वतःचा राग आहे. कॅन्सरमध्ये स्पेशालिस्ट असूनही हताश आहे म्हणून झालेला तो संताप आहे. आनंदलाही ते रागावणं समजलेलं असतं कारण आनंदच म्हणतो, माझा मृत्यु मी रोज तुझ्या चेहऱ्यावर पाहतोय आणि ते पाहण्याचं अभागीपण माझ्या वाटेला आलेलं आहे म्हणून पश्चात्तापही करतो.

“उदासी खूबसरत नहीं होती(क्या?)” बाबू मोशाय असे लाखमोलाचे बोल एका क्षणी आनंद खूपच सहजपणे बोलून जातो. पूर्ण चित्रपटात हसतखेळत राहणाऱ्या आनंदला,’ तुझं दुःख माझ्याशी शेअर कर’ अशी विनवणी डॉ. भास्कर करतात. पण आनंद दुःख वाटायला तयार नाही. ‘माफ करना, इस मामले में सेल्फिश हूँ’ असं म्हणत एकांतात दुःखावेगात असलेला आनंद लगेचच सीनमधून निघून जातो.

डॉ. भास्कर नास्तिक आहे, देवावर विश्वास नाही, पण आनंदसाठी देवही मानायला तयार होतो…रघुकाका महादेवीचा प्रसाद आणायला चार-पाच दिवसांची सुट्टी आणि पैसे हवेत म्हंटल्यावर डॉ. भास्कर लवकरात लवकर जा, वेळ खूप कमी म्हणतो. सारं समजून-उमजूनसुद्धा डॉ. भास्कर रघुकाकांच्या भाबडेपणात सहभागी होतो. हे सहभागी होणं माणसाच्या मर्यादा अधोरेखित करणारं आहे. माणूस कितीही विकसित झाला तरी याबाबतीत तो हताश आणि हतबलच आहे. अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येही सध्या मंदिरांना जागा आहे. जिथे विचार खुंटतो तिथे माणसाची शरणता आलीच.

आनंद रिलीज झाला तेव्हा भारतीय स्वातंत्र्य अवघ्या 24 वर्षांचे होते. देशभर सर्वधर्मसमभाव रुजत होता. बाहेरचं हे वातावरण आनंदमध्येही आलंय. चित्रपटात मुस्लिम ईसा आहे, ख्रिश्चन नर्स डिसाही आहे…हे दोघेही हिंदू आनंद वाचावा म्हणून अल्ला आणि जिजसकडे प्रार्थना करतात.

काळजाला हात घालणारा रेणुबरोबरचा एक संवाद हा टिपीकल हृषीदा वाटावा असा आहे. या संवादात रेणू ‘मृत्युच्या उंबरठ्यावर असलेला माणूस एवढा हसताखेळता राहत असेल तर मग देवसुद्धा त्याच्यापासून दूर राहणार नाही’ असं म्हणते आणि गाणं सुरु होतं, जिंदगी कैसे है पहेली….या गाण्यामध्ये तर जगण्या-मरण्याचे तत्वज्ञान ठासून भरलेलं आहे. हा ऊन-सावल्यांचा खेळ चालतच राहणार आहे, सुख दुःखाचा भार येतच राहणार आहे. त्याची उगाच का चिंता करत रहावी हे ते तत्वज्ञान. ते पटवून देताना हृषीदांनी फुग्यांचं प्रतीक जबरदस्त वापरलंय. आकाशात नजरेपासून दूर दूर जाणारे फुगे गाण्यातले बोल अजून गहिरे करतात.

रेणूच्या आईला भेटायला जात असताना आनंद एका कुस्तीच्या आखाड्यातल्या पैलवानांना व्यायाम करताना बघतो. अधिकाधिक जगता यावं म्हणून शरीर सुदृढ करणाऱ्यांना पाहून आनंदला हेवा वाटत नाही. आनंदून जावून स्मितहास्य देतो आणि पुढे निघून जातो. रेणुच्या आईबरोबर बोलतानाही आनंद आपल्या अटळ मृत्युबद्दल एवढ्या सहजपणे बोलून जातो की पाहणाराच आतून हलून जातो. महिन्या दीड महिन्यात मी इतका दूर जाणार आहे की तिथून परत यायचे तिकीटसुद्धा मिळत नाही म्हणतो.

आनंदमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा एकमेकांशी कमालीचा जिव्हाळा आहे, ओलावा आहे. त्यामुळंच हा चित्रपट लोकांच्या मनात घर करुन राहिला. चित्रपटातल्या एकूण एक कलाकारांनी अफलातून अभिनय केलाय. रमेश देव यांचा डॉ. प्रकाश कुलकर्णी, त्यांची पत्नी सीमा देव, नर्स बनलेल्या ललिता पवार सारे सारे त्यांच्या संवादांसह लक्षात राहतात. इतकंच काय पाहुणा कलाकार म्हणून आलेला जॉनी वॉकर तर पाच-सात मिनिटांच्या भूमिकेनं चित्रपटाचा कळस रचतो. जॉनी वॉकरच्या मुसाच्या तोंडचेच संवाद आनंदच्या तोंडी जातात आणि तोच चित्रपटाचा गाभा असल्यासारखे वाटतात.

खरं तर आनंद दिल्लीहून उपचारांसाठी मुंबईत आलेलाच नसतो. प्रेमभंग झाल्यानं त्याने दिल्ली सोडलेली असते. तरीसुद्धा आणि मृत्यु महिन्यावर आला तरी आनंद मुरारीलालच्या नाटक कंपनीतली रजनीबेन आवडल्यावर तिच्याशी लग्न करु इच्छितो, गुजरातीशिवाय तिला दुसरी भाषा येत नाही म्हंटल्यावर गुजराती शिकण्यासाठी पुस्तकं घेऊन येतो. किती हा अत्युच्च आशावाद. मृत्यु येणारच आहे, पण तो कधी आणि कसा येणार हे कुणाला माहितीय. मग का उगाच त्याच्याबद्दल विचार करुन तो आधीच जवळ का आणून ठेवावा हे यामागचं तत्वज्ञान.

आनंद हा हृषीकेश मुखर्जींच्या दिग्दर्शनाचा सर्वोच्च बिंदू आहे. मृत्युच्या अटळतेवर आधारलेल्या कहाणीतलं प्रत्येक दृश्य त्यांनी अफलातून जिवंत केलाय. हृषीदांनी पटकथा स्वतःच लिहली. चित्रपटाचे संपादनही स्वतःच केले..म्हणजे चित्रपटाला ‘सब कुछ हृषीदा’ टच होता. आनंदमधली गाणी तर अवीट आहेत. गुलजार यांची गाणी आणि मन्ना डे, मुकेश, लतादीदींचा आवाज यामुळं आनंदची गाणी चित्रपट रसिकांच्या मनात घर करुन राहिली. 50 वर्षे झाली तरी गुणगुणावी वाटतात. ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसे है पहेली’..’मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’, ‘ना जिया लागे ना’ अशी चारच गाणी या चित्रपटात आहेत. ही चारही गाणी ऐकायला लागलं की संपावी वाटत नाहीत…

आनंदच्या वेळी राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होते. कुणालाही हेवा वाटेल एवढी प्रसिद्धी त्यांना मिळाली होती. पहिले खरे सुपरस्टार राजेश खन्नाच. त्यांच्याएवढं यश व लोकप्रियता नंतर कुणाला मिळाली नाही. याचं एक उदाहरण आहे. राजेश खन्ना जिथून जायचे त्या ठिकाणी त्यांचे पाय लागलेली माती लोक कपाळाला लावायचे. लोकप्रियता मोजायला अजून कुठला निकष हवा ?

शेवटचा सीन तर चित्रपटाचा कळसाध्याय आहे. आनंदचा मृत्यु डोळ्यानं पाहू शकणार नाही म्हणून घराबाहेर पडलेले डॉ. भास्कर घरात येऊन पार्थिवावर डोके टेकवतात आणि टेपरेकॉर्डरवर, बाबूमोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हात में है जहाँपनाह, उसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं ! हम सब तो रंगमंच की कठपुतलीयाँ है, जिन की डोर उपरवाले के उँगलीयों बंधी है. कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता’ असा आनंदचा आवाज ऐकू येतो..पाहणाऱ्याला मृत्युच्या अटळतेची सत्यता अजून पटून जाते. मनात हे पटणं सुरु असतानाच आनंद आणि डॉ. भास्कर यांच्या खळखळून हसण्याचा आवाज येतो….मग डॉ.भास्करही आनंद मरा नहीं, आनंद मरते नाही म्हणत असतानाच चित्रपट संपतो आणि पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांच्या विचारालाच चालना देऊन जातो…थिएटरमध्ये चित्रपट संपला तरी मनात तो सुरुच राहतो….घोळत राहतो…आज 50 वर्षानंतरही तो असाच घोळत आहे…

संबंधित बातम्या

आनंद शिंदे राजकारणात आले, राजकीय पक्षही स्थापन केला; तुम्हाला माहीत आहे का?

मसाबाकडून जुन्या आठवणींना उजाळा, विव्ह रीचर्ड्स-नीना गुप्ता यांचे अनसीन फॅमिली फोटो शेअर

Golden Jubilee of ‘Anand’ Movie which explains the philosophy of life and death