आतंरराष्ट्रीय गायक Akon मराठीतून गाणं गाणार?

एकॉन लवकरच मराठीतून गाणे गाणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात एकॉनसोबतच नुकत्याच रिलीज झालेल्या गली बॉय या चित्रपटातील रॅपर्सही दिसणार आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:30 PM, 4 Jun 2019
आतंरराष्ट्रीय गायक Akon मराठीतून गाणं गाणार?

मुंबई : हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एकॉनने(Akon) आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. भारतीय लोकांना एकॉन या गायकाची ओळख अभिनेता शाहरुख खानच्या रा-वन या छम्मक छल्लो या गाण्यामुळे झाली आहे. या गाण्यानंतर एकॉनच्या भारतीय चाहत्यांमध्ये तिप्पटीने वाढ झाली. एकॉनचे सध्या भारतात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी एकॉन लवकरच मराठीतून गाणे गाणार असल्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एकॉन लवकरच भारतीय चाहत्यांसाठी एक गाणं गाणार आहे. विशेष म्हणजे हे गाणं मराठीतून असणार आहे. महाराष्ट्रातील एडी मीडिया पुणे या डिजीटल मार्केटिंग कंपनीद्वारे एकॉनचे हे नवं गाण चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

एडी मीडिया या कंपनीचे मालक अक्षय गिरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी काही महिन्यांपूर्वी एकॉनचं छम्मक छल्लो हे गाणं ऐकलं. हे गाणं ऐकल्यानंतर मी त्या गाण्याच्या प्रेमात पडलो. जर एकॉनचं हिंदी गाणं इतकं सुपरहिटं ठरु शकतं, तर मग त्याचं मराठी गाणही तितकच हिट होईल, अशी माझी खात्री आहे”.

खरतंर याबाबत काही सांगणे खूप लवकर होईल, पण हो हे खरं आहे की एकॉन लवकरच एक मराठी गाणं गाणार आहे. सध्या एकॉनसोबत आमची चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतरच अधिकृतपणे एकॉन मराठी गाणं गाणार का याबाबतची घोषणा केली जाईल. 2019 या वर्षाच्या अखेरपर्यंत हे गाणं रिलीज होणार आहे. एकॉनचे हे नवं गाणं पुणे किंवा मुंबईत शूटींग करण्यात येणार आहे. छम्मक छल्लो या गाण्याप्रमाणे हे गाणं एकॉनच्या चाहत्यांना नक्की आवडले,” अशी माहिती एडी मीडिया या कंपनीचे मालक अक्षय गिरमे यांनी दिली.

एकॉन हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर आहे. एकॉनचा पहिला अल्बम 2004 साली लाँच झाला. एकॉनने आतापर्यंत Right Now, smack that, Lonely यांसह अनेक हॉलिवूड गाणी गायली आहे. त्याशिवाय त्याने रा-वन या चित्रपटातील प्रसिद्ध छम्मक छल्लो हे गाणं गायल आहे. या गाण्यामुळे त्याला भारतातील लोकांमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. पण त्यानंतर मात्र त्याने कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी गाणं गायलेले नाही. विशेष म्हणजे या गाण्यात एकॉनसोबतच नुकत्याच रिलीज झालेल्या गली बॉय या चित्रपटातील रॅपर्सही दिसणार आहे.