
Rishab Shetty : कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चाप्टर 1’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटासोबतच ऋषभचं खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत आलं आहे. त्याची पत्नी कोण आहे, त्याच्या कुटुंबात कोण-कोण आहेत, त्याच्या लग्नाची कहाणी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 42 वर्षीय ऋषभ शेट्टीने 2017 मध्ये प्रगती शेट्टीशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा रणवीत आणि एक मुलगी राध्या आहे. ऋषभची पत्नी प्रगती ही कॉस्च्युम डिझायनर आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ आणि आताच्या ‘कांतारा: चाप्टर वन’साठी तिनेच कॉस्च्युम डिझाइनिंग केली आहे.
‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये प्रेक्षकांनी प्रगतीला राजाच्या पत्नीच्या रुपात पाहिलं. त्यात प्रेक्षकांनी तिला लगेच ओळखलं. प्रगतीने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारल्याचं लगेच प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगासुद्धा होता. ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभने सांगितलं होतं की, “या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीने खूप साथ दिली होती. चित्रपटात एखादं कठीण साहसदृश्य असेल तर ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. शूटिंगमुळे मी अनेक महिन्यांपर्यंत घरी जाऊ शकत नव्हतो. भावनिकदृष्ट्या तिने माझी खंबीर साथ दिली. मुलांचीही देखभाल तीच करायची.”
एका मुलाखतीत ऋषभ त्याच्या संघर्षाबद्दल म्हणाला, “प्रत्येकाला एक वेगळा संघर्ष असतोच. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला एका प्रक्रियेतून जावं लागतं. मी माझ्या संघर्षाला एक प्रक्रिया मानतो. मी लहान-मोठी सर्व कामं केली आहेत. मी पाण्याच्या बाटल्या विकायचो. मी रिअल इस्टेट आणि हॉटेलमध्येही काम केलंय. इंडस्ट्रीमध्ये मी क्लॅपर बॉयपासून सुरुवात केली. अनेक लहान भूमिका केल्या. पण कधीही कोणतंही काम मी कमी लेखलं नाही. मला अजूनही माझी पहिली कमाई आठवते. मी पाण्याच्या बाटल्या विकून 25 रुपये कमावले होते.”
ऋषभ आणि प्रगतीची पहिली भेट एका चित्रपटाच्या कार्यक्रमात झाली होती. त्याच्या काही आठवड्यांनंतर दोघं फेसबुकवर चॅट करू लागले होते. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रुपांतरित झाली. प्रगतीचे कुटुंबीय तिच्या रिलेशनशिपच्या विरोधात होते, असंही म्हटलं जातं. कारण तेव्हा ऋषभला चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नव्हतं. तो संघर्षच करत होता. अखेर आईवडिलांची मनधरणी केल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केलं.