लता मंगेशकर रुग्णालयात असतानाचा फोटो व्हायरल

फोटोत दीदी खूपच अशक्त दिसत असल्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याची विनंती करत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत

लता मंगेशकर रुग्णालयात असतानाचा फोटो व्हायरल

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर 28 दिवसांच्या उपचारानंतर ब्रिच कँडी रुग्णालयातून घरी परतल्या. खुद्द दीदींनी ट्विटरवरुन आपली प्रकृती सुधारत असल्याची माहिती दिल्यामुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला लतादीदींचा एक फोटो ( Lata Mangeshkar Viral Photo) चाहत्यांच्या काळजीत काहीसा भर घालत आहे.

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने लता मंगेशकर यांना 12 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना 8 डिसेंबरला डिस्चार्ज देण्यात आला.

सोशल मीडियावर लतादीदी रुग्णालयात असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दीदी खूपच अशक्त दिसत असल्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याची विनंती करत सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘नमस्कार, मी गेल्या 28 दिवसांपासून ब्रिच कँडी रुग्णालयात होते. मला न्यूमोनिया झाला होता. मी पूर्णपणे बरी होऊनच घरी परत जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती, आज मी घरी परतले आहे. देव, माई-बाबांच्या आशीर्वादाने आणि आपणा सर्वांचं प्रेम, प्रार्थनेने मी आता ठीक आहे, मी तुम्हा सर्वांची आभारी आहे’ असं ट्वीट लता मंगेशकर यांनी केलं होतं.

वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Lata Mangeshkar Viral Photo) लतादीदींसोबत ब्रिच कँडी रुग्णालयातील नर्स दिसत आहेत. त्यांनीच गेल्या 28 दिवसांत लतादीदींची काळजी घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *