महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ च्या टीमचा छापा

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:48 PM, 3 Dec 2018

मुंबई : अनेक सिनेमांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसलेले सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावरच छापा मारण्यात आला. हा छापा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्पेशल 5 च्या टीमने मारला. होय, स्पेशल 5 ची टीम, जी स्टार प्रवाहवर नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेश कोठारेंच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे, हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल 5’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.

‘स्पेशल 5’ ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलिसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे.
महेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल 5’ च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली. ‘स्पेशल 5’ टीमची शौर्यगाथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. 10 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर हा शो पाहता येणार आहे.