मानुषी छिल्लरचं बॉलिवूड पदार्पण, या अभिनेत्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार

मानुषी छिल्लरचं बॉलिवूड पदार्पण, या अभिनेत्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार

मुंबई :बॉलिवूडमध्ये सध्या 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्या पदार्पणाची जोरदार चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. मानुषीने सध्या दोन सिनेमे साईन केले आहेत. यामध्ये पहिला सिनेमा ती दिग्दर्शक फराह खानसोबत करणार आहे. तर, दुसरा सिनेमा हा यशराज फिल्म्ससोबत करणार आहे. तसेच, मानुषी यशराज फिल्म्सच्या सिनेमात अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसणार असल्याची माहिती आहे. रणवीर सिंग हा सध्या त्याच्या ‘83’ या सिनेमाची तयारी करत आहे.

मानुषी फराह खानच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचे निर्माते रोहित शेट्टी असणार आहेत. यानंतर मानुषी ही रणवीरसोबत सिनेमा करणार आहे.मानुषी आणि रणवीरने यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये सोबत काम केलं आहे. मानुषीच्या बॉलिवूड पदार्पणाने आणखी एका मिस वर्ल्डची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे.

‘पद्मावत’, ‘सिंबा’ आणि ‘गल्ली बॉय’ सारखे हिट सिनेमे देणारा रणवीर आता पुन्हा एकदा यशराज फिल्म्ससोबत काम करणार आहे. रणवीरला यशराज फिल्म या प्रोडक्शन हाऊसनेच लाँच केलं होतं. त्याच्या आगामी सिनेमात रणवीरसोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर असेल. या सिनेमाचं दिग्दर्शन मनीश शर्मा करणार आहेत. रणवीरच्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शनही मनीष शर्मा यांनीचं केलं होतं.

सध्या रणवीरच्या ’83’ या सिनेमाचीही बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. रणवीर सिंग त्याच्या आगामी सिनेमा ‘83’ साठी खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमात तो माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्व कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. त्यासाठी त्याला खुद्द कपिल देव हेच प्रशिक्षण देत आहेत. ‘83’ हा सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्व चषकामधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.