REVIEW : तापसीचा चुकलेला ‘गेम’

हॉररपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉररपट बनवणं हे दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन असतं. कारण प्रेक्षकांना दचकवणं, धक्का तंत्राचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

REVIEW : तापसीचा चुकलेला 'गेम'

हॉररपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉररपट बनवणं हे दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन असतं. कारण प्रेक्षकांना दचकवणं, धक्का तंत्राचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही. ‘माया’ आणि ‘इरावकलम’ या तामिळ हॉरर सिनेमांचा दिग्दर्शक अश्विन सरवननचा ‘गेम ओव्हर’ हा सिनेमाही हॉरर-सस्पेन्स या जॉनरमधलाच. गुरुग्राममध्ये 27 वर्षाच्या एकट्या राहणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात येते. तिचं मुंडक शरीरापासून वेगळं करुन फुटबॉलसारखं फेकुन देतो. बरं खुनी एवढ्यावरचं थांबत नाही तर त्या मुलीच्या धडाला आगीच्या लपेट्यात फेकतो. हे वाचून अंगावर काटा आला ना. याच थरारक दृश्यानं या सिनेमाची सुरुवात होते. हे दृश्य बघतांना तुम्हालाही आपण एक वेगळ्या जॉनरचा हॉरर आणि थ्रिलर जॉनरचा सिनेमा बघणार असल्याची जाणीव होते, पण ही फक्त जाणीवचं होते बरं का ! नंतर मात्र आपल्याला फिल्मच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी केलेले ढीगभर ट्विट हा सिनेमा संपत नाही तोपर्यंत आठवत राहतात. असो आपलं प्रोडक्ट विकायची सगळ्यांनाच सूट आहे. ‘शान’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक शानदार संवाद आहे,’ में हमेशा घर मे घुस कर मारता हु’! घरात घुसुन मारणं ही हिंदी सिनेमाची सगळ्यात दमदार थीम आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं ‘कौन’ सिनेमात या थीमचा अचूक वापर केला होता. ‘गेम ओव्हर’ हा सिनेमाही याच जॉनरमधला. दिग्दर्शकानं प्रयत्न चांगला केला आहे. सिनेमाची सुरुवातही भन्नाट होते. परंतु तिचं लय शेवटपर्यंत कायम ठेवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. नायिका अंधाराला घाबरुन पळते, किंचाळते, सतत कुठल्यातरी गोष्टीची भीती मनात बाळगते हॉरर सिनेमांची हीच व्याख्या आपल्याला माहिती आहे का हे आता वाटायला लागलंय.

चित्रपटाची कथा एका शब्दात सांगायची झाली तर ‘काळोख आणि भूतकाळात घडलेल्या घटनांच्या भीतीवर विजय मिळवण्याची शर्यत’. ही थीमलाईन अचूक हेरत दिग्दर्शकानं ‘गेम ओव्हर’ गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ गम डेवलपर सपना (तापसी) आपली हाऊसमेड कलम्मा (विनोदिनी) सोबत एकटीच राहत असते. सपनाला एक आजार असतो. भूतकाळात तिच्यासोबत घडलेल्या घटनेची तारीख जवळ येताच सपनाला जबरदस्त पॅनिक अटॅक येतो आणि तिचा जीव कासावीस व्हायला लागतो. जेव्हा सपनाला कळतं की तिने हातावर काढलेला टॅटू साधारण नसून त्यामागे एक रहस्य दडलंय तेव्हा चित्रपट थरारक वळण घेतो. या टॅटूच्या शाईमध्ये ज्या 27 वर्षीय मुलीची निर्घुण हत्या झाली असते तिची राख मिसळलेली असते. त्यानंतर सुरु होतो एक थरारक खेळ. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

सिनेमाची कथा उत्तम होती. जर ती अजून उत्तमरित्या फुलवली असती तर चित्रपटानं वेगळीच उंची गाठली असती. बॉलिवूडमध्ये थ्रिलर आणि सुपरनॅचरल सिनेमांची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ बघायला मिळते. हा सिनेमा निश्चितच यापेक्षा वेगळा यासाठी आहे कारण थ्रिलर आणि सुपर नॅचरलचं मिश्रण सिनेमात करण्यात आलं आहे. अश्विन श्रवननचा दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा आपलं वेगळेपण जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हा चित्रपट हिंदीत डब करण्यात असल्यामुळे विनोदिनी आणि इतर कलाकारांची डबिंग अर्थातचं खटकते. या सिनेमाची खऱ्या अर्थाने जान आहे तापसी पन्नू. तापसीने हिंदी सिनेमात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. प्रत्येक सिनेमागणिक काहीतरी वेगळं करण्याचा तापसी प्रयत्न करते. पण तिचा हाच प्रयोग तिच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. कारण सूरमा आणि मनमर्जियामध्ये दबंग अंदाजात दिसलेली तापसी या सिनेमात मात्र वेगळ्याच अवतारात दिसलीय आहे. तापसीचा हा अंदाज कदाचित तिच्या चाहत्यांना आवडणार नाही. तापसीला याचा फटका कदाचित तिचा पुढचा चित्रपट ‘सांड की आंख’च्या वेळेस बसण्याची शक्यता आहे. हे सगळं काहीही असो तिनं काम मात्र भन्नाट केलंय. हा संपूर्ण सिनेमा तिनं एकटीच्या खांद्यावर पेलला आहे. प्रत्येक सीनला एक्सप्रेशनमध्ये विविधता आणणं ही काय सोपी गोष्टी नाही. तापसीने मात्र हे लीलया पेललं आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही भन्नाट आहे. बॅकग्राऊंड स्कोरचाही एखाद्या पात्रासारखा सिनेमात वापर करण्यात आला आहे. एवढं सगळं उत्तम असूनही हा सिनेमा चुकल्यासारखा वाटतो. ‘गेम ओव्हर’ हा ना तर हॉरर आहे ना तर सायकॉलॉजिकल थ्रिलर. हा सिनेमा या दोघांच्या मधलं असं मिश्रण आहे. ज्यात प्रत्येक चौथ्या दृश्यागणिक पाचव्या दृश्यात काय होणार हे आपल्याला कळून जातं. चित्रपटातील काही दृश्य बघुन तुम्ही कनफ्यूजही व्हाल की हे असं कसं झालं. चित्रपट संपल्यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तंर तुमच्या मनात घोळत राहतील.

असो जर तुम्हाला ह्या जॉनरचे चित्रपट आवडत असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठी ट्रीट आहे. या सिनेमाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य् म्हणजे दिग्दर्शकानं सिनेमाचं ड्युरेशन फक्त एक तास 40 मिनिट एवढचं ठेवलंय. त्यामुळे घटना पटापट घडतात. पण त्या घटनांचा योग्य ताळमेळ दिग्दर्शकानं जर राखला असता तर कदाचित एक उत्तम सिनेमा तुम्हाला बघायला मिळाला असता, असं मला राहून राहून वाटतंय. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय अडीच स्टार्स

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI