
पंजाबी संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गायक राजवीर जवंदाचं बुधवारी निधन झालं. गेल्या 12 दिवसांपासून त्याच्यावर मोहाली इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 27 सप्टेंबर 2025 रोजी राजवीर बाइक राइडिंगसाठी गेलो होता. बद्दीहून शिमल्याला जाताना पिंजौरमध्ये त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करत असताना हृदयविकाराचा झटकासुद्धा आला होता. तेव्हापासून तो रुग्णालयात आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होता. अखेर बुधवारी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या निधनाने पंजाबी कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीरच्या निधनावर पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा आणि अभिनेता गुरप्रीत घुग्गी यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी गायक दिलजीत दोसांझने त्याच्या लाइव्ह शोदरम्यान राजवीरच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.
राजवीर जवंदाच्या निधनाचं वृत्त समोर येताच रुग्णालयाबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यानंतर मोहाली पोलिसांनी रग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली. राजवीरच्या पार्थिवावर त्याच्या गावी पौना इथं अंत्यसंस्कार पार पडतील, असं समजतंय. अभिनेत्री नीरु बाजवाने सोशल मीडियावर लिहिलं, ‘एक तरुण आणि प्रतिभावान गायकाच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला आहे. राजवीरच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करते. तो आम्हाला फार लवकर सोडून गेला, परंतु त्याला कधीच विसरलं जाऊ शकत नाही.’
‘मृत्यू जिंकला, तारुण्य हरलं. आम्ही तुला कसं विसरणार छोटा भाऊ’, अशा शब्दांत पंजाबी अभिनेता गुरप्रीत घुग्गीने भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता बीएन शर्मानेही पोस्ट लिहित राजवीरला श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या शनिवारी राजवीर शिमल्याला जात होता. तेव्हा त्याची बाईक गुरांना धडकली. या अपघातात राजवीरच्या डोक्याला आणि पाठीच्या कणाला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर त्याला मोहाली इथल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
राजवीर जवंदाने ‘सरदारी’, ‘जोर’, ‘कली जवंदे दी’, ‘रब करके’ आणि ‘मेरा दिल’ यांसारखी गाणी गायली आहेत. उत्तम गायकासोबतच तो दमदार अभिनेतासुद्धा होता. त्याने ‘जिंद जान’, ‘सुभेदार जोगिंदर सिंह’, ‘मिंदो तसीलदारनी’ आणि ‘काका जी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राजवीरचं युट्यूब चॅनलसुद्धा आहे.