रिंकूच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:23 PM, 11 Mar 2019
रिंकूच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : आपल्या पहिल्याच सिनेमाने महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरु ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावायला येते आहे. तिच्या आगामी सिनेमाचा पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला आहे. रिंकू राजगुरुच्या ‘कागर’ सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला’, अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. दिगदर्शक मकरंद माने यांनी या सिनेमाचे दिगदर्शन केलं आहे.


‘सैराट’ सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी रिंकू आता एका नव्या रुपात ‘कागर’ सिनेमात दिसणार आहे. याचं पोस्टर सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलं. मकरंद माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे रिंकू आणि कागर सिनेमाचे दिग्दर्शक दोघेही अकलूजचेच आहेत आणि दोघांनाही एकाचवेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मकरंद माने यांना रिंगण सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हा सिनेमा ‘व्हॅलेंटाइन डे’ रोजी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ला प्रदर्शित होणार होता. मात्र, रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रिंकूच्या 2016 साली आलेल्या ‘सैराट’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या सिनेमातील ‘आर्ची’ची भूमिका लोकांनी उचलून धरली होती. याच सिनेमातील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत 110 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी दिशा आणि ओळख मिळवून दिली. त्यानंतर रिंकूच्या या सिनेमाचा हिन्दी रिमेक ‘धडक’ बनवण्यात आला.