शाहीद कपूरचे सावत्र वडील 52 व्या वर्षी पुन्हा बाबा!

अभिनेता शाहीद कपूरचे सावत्र वडील, अभिनेते राजेश खट्टर पुन्हा एकदा बाबा झाले आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना मुलगा झाला.

शाहीद कपूरचे सावत्र वडील 52 व्या वर्षी पुन्हा बाबा!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचे (Shahid Kapoor) सावत्र वडील, तर अभिनेता इशान खट्टरचे (Ishan Khattar) सख्खे वडील पुन्हा एक बाबा झाले आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेते राजेश खट्टर (Rajesh Khattar) यांना दुसरा मुलगा झाला. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने वंदना सजनानी यांनी अखेर मातृत्वसुख अनुभवलं.

असंख्य गर्भपात, आयव्हीएफ, आययूआय आणि सरोगसीचे प्रयत्न केल्यानंतर मी वडील झालो, याचा आनंद राजेश खट्टर यांनी व्यक्त केला. पन्नाशीनंतर पितृत्व अनुभवणारा मी पहिलाच नाही. वयाचा मुद्दा असला, तरी स्वतःच्या बाळासाठी पत्नीने सोसलेल्या यातना पाहता मी आनंद मानण्याचं ठरवलं आहे, असं खट्टर म्हणाले. वनराज कृष्ण असं त्यांनी बाळाचं नाव ठेवलं आहे.

कपूर कुटुंबातील गुंतागुंतीची नाती

अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री निलीमा अझीज हे शाहीद कपूरचे सख्खे आई-वडील. तर राजेश खट्टर हे शाहीदचे सावत्र वडील आहेत. खट्टर यांनी काही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

सूर्यवंशम चित्रपटातील हिरा ठाकूर (अमिताभ बच्चन) यांच्या भावाची भूमिका त्यांनी केली होती. याशिवाय डॉन रिमेक, डॉन 2, एक मै और एक तू, रेस 2 यासारखे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट गाजले. कुमकुम, बिदाई, बेहद, बेपनाह यासारख्या मालिकांमध्येही ते झळकले आहेत.

घटस्फोटानंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी विवाह केला. तर निलीमा अझीज यांनी 1990 मध्ये राजेश खट्टर यांच्याशी लगीनगाठ बांधली होती. त्यांना इशान खट्टर हा मुलगा झाला. इशानने ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’मध्ये मुख्य भूमिका केली होती.

2001 मध्येच निलीमा अझीजपासून राजेश खट्टर विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी 2008 मध्ये वंदना सजनानी यांच्याशी विवाह केला. गेल्या अकरा वर्षांपासून ते बाळासाठी प्रयत्न करत होते.

कपूर कुटुंबातील सर्वांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत. शाहीदची सख्खी आई निलीमा, सावत्र आई सुप्रिया पाठक आणि सावत्र वडलांची बायको वंदना या तिघी शाहीदच्या लग्नात वरमाय म्हणून मिरवल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *