जावेद अख्तरांना सीतेच्या अपहरणावरील वक्तव्य भोवणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:10 AM, 7 May 2019
जावेद अख्तरांना सीतेच्या अपहरणावरील वक्तव्य भोवणार?

नवी दिल्ली : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मग ते कन्हैय्या कुमारच्या प्रचारासाठी असो किंवा बुरखा आणि घुंगट बंदीची मागणी करण्यासाठी. मात्र, यावेळी जावेद अख्तर यांना बेधडकपणे आपलं मत मांडणं चागंलचं भोवलं आहे. कारण, त्यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुर यांच्या समर्थकांनी आता जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीचा दावा करत याचिका दाखल केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुर या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत.

काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी भोपाळ येथे एका पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंग यांची तुलना साधूच्या वेषात आलेल्या रावणाशी केली होती. “साधूंच्या वेशात आलेल्यांवर विश्वास ठेऊ नका. कारण रावणाने देखील साधूच्या वेशात येऊनच सीतेचं अपहरण केलं होतं. त्यामुळे भोपाळच्या जनतेने साधूंपासून वाचून राहावं”, असं बेधडक वक्तव्य करत जावेद अख्तर यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर टीका केली होती. जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंगचे समर्थक नाराज झाले आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 24 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

भोपाळच्या पत्रकार परिषदेत जावेद अख्तर यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनी बुरखा बंदी प्रमाणेच घुंगट बंदीही करण्यात यावी अशी मागणीही केली. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यांवर साध्वी प्रज्ञा सिंगचे समर्थकच नाही तर करणी सेनाही नाराज झाली होती. घुंगट बंदीच्या मुद्यावर नाराज करणी सेनेने जावेद अख्तर यांनी माफी मागितली नाही तर त्यांना घरात घुसून मारु अशी थेट धमकी दिली होती.

करणी सेनेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जीवन सिंह सोळंकी यांनी पत्र प्रसिद्ध केलं होतं. “बुरखा हा दहशतवादाशी जोडला आहे. मात्र, घुंघटचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जावं”, अशी धमकी सोळंकी यांनी दिली होती. जर तुम्ही माफी मागितली नाही, तर तुमच्या घरात घुसून मारु, असंही या पत्रात म्हटलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून जावेद अख्तर हे अनेक राजकीय मुद्यांवर आपली मतं मांडत आहेत. बेगुसराय येथील सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांचं समर्थन करण्यासाठी जावेद अख्तर पत्नीसह गेले होते. यावेळी त्यांनी कन्हैय्या कुमारसाठी मतं मागितली होती.

संबंधित बातम्या :

‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’

तीन दिवसात माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारु, करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी

निवडणूक आयोगाकडून प्रज्ञा ठाकूरांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी