ऐश्वर्याबाबत ‘विवेकशून्य’ ट्वीट, विवेक ओबेरॉयवर गुन्ह्याची मागणी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:21 PM, 20 May 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून 23 मे रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. तत्पूर्वी निकालाचा अंदाज वर्तवणारे अनेक एक्झिट पोल रविवारी आले. त्यानुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स शेअर केले जात असून विरोधी पक्षांची चेष्टा केली जात आहे. मात्र, भाजपचा समर्थक बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने एक वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यानंतर त्याला ट्विटर युजर्सकडून ट्रोल करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या ट्वीटसाठी विवेक ओबेरॉयविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विवेक ओबेरॉयने एक ट्विट शेअर केले आहे, त्यात एक्झिट पोलची चेष्टा करताना ऐश्वर्या राय बच्चनलाही लक्ष्य केले आहे. विवेक ओबेरॉयने ट्विट सोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यात ऐश्वर्याला प्रथम सलमान खानसोबत, दुसऱ्या फोटोत स्वतः विवेक ओबेरॉयसोबत आणि अंतिमतः अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत दाखवले आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन दिले आहे, “Haha! creative! No politics here….just life”.

‘भाजप नेते आणि भाजप समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे’

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विवेक ओबेरॉयवर कारवाईची मागणी करत महिला आयोग यावर गप्प का असाही प्रश्न विचारला. मलिक यांनी ट्वीट केले, “भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. भाजपा समर्थक व सिनेअभिनेता विवेक ओबेरॉयने पद्मश्री पुरस्कार प्राप्त देशातील प्रसिद्ध महिलेबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद ट्वीट करूनही महिला आयोग यावर गप्प का?”

‘ऐश्वर्याची बदनामी करण्याचा प्रयत्न उघड’

यानंतर ट्विटर युजर्सने विवेक ओबेरॉयची चांगलीच कानउघडणी केली. भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने विवेक ओबेरॉयच्या ट्वीटला निराशाजनक आणि मूर्खपणाचे म्हटले आहे. एका अन्य महिलेने म्हटले, “विवेक हे ट्वीट तुझ्याबद्दल नाही हे तुला चांगले माहिती आहे. ऐश्वर्याबद्दलचे हे खालच्या स्तरावरील मिम्स व्हायरल करण्याचा तुझा घृणास्पद प्रयत्न उघड झाला आहे. तू येथे फक्त मूर्खांनाच वेड्यात काढू शकतोस.”

तू मर्यादा ओलांडली आहेस : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत विवेक ओबेरॉयला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले. आव्हाड म्हणाले, “एखादा व्यक्ती किती खालच्या स्तरावर जाऊ शकतो? महिलेंबद्दलचा अनादर यातून पाहता येऊ शकतो. तू मर्यादा ओलांडली आहेस आणि महिलांचा अपमान केला आहे.” आव्हाड यांनी यावेळी सलमान खान नावाच्या एका अन्य ट्विटर हँडललाही टॅग केले.

चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगही विवेक ओबेरॉयच्या या ट्वीटवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

विवेकच्या या ट्वीटनंतर समर्थकांमध्येही दोन गट

ऐश्वर्याबद्दल केलेल्या या ट्वीटवर विवेक ओबेरॉयच्या समर्थकांनी विवेकच्या या कृतीचे समर्थन करत त्याच्या धाडसाचे कौतूक केले. दुसरीकडे असेही काही समर्थक होते ज्यांनी या ट्वीटवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. तसेच विवेकने हे ट्विट तात्काळ डिलिट करावे, अशी मागणी केली.