त्यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा!; बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती रवींद्र महाजनींच्या पत्नीची मदत
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी बाबाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा देखील उल्लेख केला आहे. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया...

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या आई माधवी महाजनी यांचं अलीकडेच ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी वानखेडे स्टेडियम आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला आहे. माधवी एकेकाळी वानखेडे स्टेडियममध्ये नोकरीला होत्या, त्या काळातील ही घटना आहे. तिथे काम करताना त्यांना काही कर्मचाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागला होता. जेव्हा ही बाब बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी तात्काळ पावल उचलले. हा संपूर्ण किस्सा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात उलगडला आहे.
माधवी यांच्या हाताखाली होते आठ कर्मचारी
माधवी यांनी वानखेडे स्टेडियममध्ये देखरेख आणि व्यवस्थापनाचं काम केलं होतं. त्यांच्या हाताखाली आठ कर्मचारी काम करायचे. त्यांचं काम स्वच्छता आणि स्टॉक तपासणीचं होतं. स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांपैकी त्या एकमेव पदवीधर होत्या. पण यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली. ऑफिसमध्ये लेटमार्कची पद्धत होती. दोनदा लेटमार्क चालायचं, पण तिसऱ्या वेळी लेटमार्क झाल्यास एका दिवसाचा पगार कापला जायचा. काही कर्मचारी माधवी यांच्या नावासमोर जाणीवपूर्वक लाल खुणा करून त्यांचं रेकॉर्ड खराब करायचे.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
पत्रकाराने केली मदत
एकदा घरी परतल्यानंतर माधवी यांनी आपला राग पती रवींद्र महाजनी यांच्याकडे व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मी सगळं काम नीट करत असतानाही कोणीतरी माझं रेकॉर्ड खराब करत आहे.” त्याचवेळी रवींद्र यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला एक पत्रकार तिथे उपस्थित होता. त्याने हे संभाषण ऐकलं आणि कोणाशीही न बोलता थेट मीनाताई ठाकरे यांना फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माधवी यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ निश्चित केली. माधवी यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्या म्हणाल्या, “एवढ्या छोट्या गोष्टीसाठी बाळासाहेबांना सांगण्याची काय गरज होती?” पण पत्रकाराने आधीच भेटीची व्यवस्था केली होती.
यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा!
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी माधवी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेल्या. तिथे बाळासाहेबांनी त्या वेळच्या युनियन लीडर मोरेला बोलावलं. तो घाबरलेल्या अवस्थेत, घाम पुसत मातोश्रीवर पोहोचला. बाळासाहेबांनी त्याला कडक शब्दांत सुनावलं, “ह्या कोण आहेत माहिती आहे का? यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा!” मीनाताई ठाकरेही तिथे होत्या आणि त्यांनी माधवी यांना आत बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीनंतर वानखेडे स्टेडियममधील कोणीही कर्मचारी माधवी यांना त्रास देण्याची हिम्मत करू शकला नाही.
