गणेशोत्सवात प्रसादातून घातपाताची भीती, सार्वजनिक मंडळांना हायअलर्ट

जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर गणेशोत्सवादरम्यान समाजकंटकांकडून घातपात घडवला जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रसाद तयार करताना काळजी घेण्याच्या सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवात प्रसादातून घातपाताची भीती, सार्वजनिक मंडळांना हायअलर्ट

नागपूर : जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 (Jammu Kashmir Article 370) हटवल्यानंतर देशभरात अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान (Ganesh Chaturthi) महाप्रसादातून घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नोटीस जारी केली आहे.

जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर समाजकंटकांकडून घातपात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पुढील आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सर्वाधिक धूम असते. त्यामुळे ही संधी साधून दहशतवादी गणपतीच्या प्रसादातून घातपात घडवण्याची तयारी करु शकतात.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व गणपती मंडळांना नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक मंडळांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसादाच्या माध्यमातून विषबाधा केली जाऊ नये, यासाठी सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

प्रसाद तयार करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. इतर कुणी मंडळाच्या प्रसादासोबत बाहेरचा प्रसाद एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर करु नका, असंही बजावण्यात आलं आहे.

येत्या सोमवारी, म्हणजेच 2 सप्टेंबर 2019 रोजी गणेश चतुर्थीला राज्यभरात गणरायांचं थाटामाटात आगमन होईल. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पाच, सात किंवा अकरा दिवसांसाठी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येईल. अकरा दिवसांनी म्हणजेच 12 सप्टेंबर 2019 रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणरायांना निरोप देण्यात येईल.

अकरा दिवसांच्या काळात राज्यभरातील गणेशभक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दिवसरात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हजेरी लावतील. यावेळी दहशतवादी प्रसादात विष कालवून गणेशोत्सवाला गालबोट लावू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *